सावित्रीच्या लेकींना सायकल मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:26 IST2018-11-30T00:25:58+5:302018-11-30T00:26:17+5:30
अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत सायकल वाटप कधी करण्यात येणार असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे.

सावित्रीच्या लेकींना सायकल मिळणार कधी?
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत सायकल वाटप कधी करण्यात येणार असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून मात्र याबाबत हवी तशी दखल घेतली जात नाही, शिवाय सध्या प्रक्रिया सुरूच असल्याचे सोपस्कार उत्तर मिळत आहे.
शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मानव विकास कार्यक्रम योजने अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर वर्गही करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबर रोजी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर सायकल वाटपची रक्कम जमा करण्यात येणार होती. परंतु सदर रक्कम जमा झाली किंवा नाही, याबाबत माध्यमिक शिक्षणच्या संबधित विभागाकडून सांगण्यात टाळाटाळ केली जात आहे.
परंतु याकामी होणारी संबधितांची दिरंगाई व नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडल्या नाही. त्यामुळे ग्रामीण मुलींची पायपीट होते. सध्या माध्यमिक शिक्षण खात्याला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे येथील अनेक कामांचा खोळंबा उडत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे माध्यमिकचा प्रभार आहे. परंतु दोन्ही कामांचा व्याप पाहता कार्यालयीन इतर कामांचा खोळंबा उडत आहे. मुलींना मोफत सायकल वाटपासाठी लागणाऱ्या निधीस तांत्रिक मान्यता मिळाली. १७ आॅक्टोबर रोजी जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजारांचा निधी वर्ग करण्यात आला. संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर हा निधी वर्ग केला जाणार होता. सोमवारपर्यंत निधी वर्ग करण्याचे नियोजन होते. या ताळमेळात मात्र हजारो गरजू मुली सायकलच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे संबधित अधिकारी खरंच लक्ष देतील का? मुलींच्या हाती आतातरी सायकल पडतील का? हे सांगणे मात्र कठीण आहे.
शाळेतील मुलींची गळती थांबावी व शाळेत येताना विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्या अनुषंगानेच मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतरावर राहणाºया गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. परंतु योजनेचा लाभ कधीच वेळेत मिळत नाही. अर्धे वर्ष उलटन्यानंतर मुलींच्या हाती सायकली पडत नाहीत. शासनाकडून आलेला निधी वेळेत बँकेत वर्ग होत नाही. यासह विविध कारणांमुळे मात्र मोफत सायकल विद्यार्थिनींना वेळेत मिळत नाही.