घोषणेचे काय झाले? बांधकाम मजुरांना एक पैशाचीही मदत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST2021-05-08T04:30:58+5:302021-05-08T04:30:58+5:30
हिंगोली : कडक संचारबंदी काळात मजुरांची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने बांधकाम मजुरांच्या खात्यावर प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत ...

घोषणेचे काय झाले? बांधकाम मजुरांना एक पैशाचीही मदत नाही
हिंगोली : कडक संचारबंदी काळात मजुरांची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने बांधकाम मजुरांच्या खात्यावर प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जमा करण्याचे जाहीर केले होते; मात्र अद्याप मजुरांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही निर्बंध घातल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या काळात नागरिकांना घरातच थांबावे, लागत आहे. बांधकाम साहित्य विक्री दुकानेही बंद असल्याने बांधकामे ठप्प पडली असून, यावर अवलंबून असलेल्या बांधकाम मजुरांवर मोठे संकट कोसळले आहे. हाती मजुरी येत नसल्याने घर कसे चालवावे, याची चिंता लागली आहे. बांधकाम मजुरांची हेळसांड होऊ नये, यासाठी शासनाने प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते; मात्र अद्याप ही मदत मजुरांपर्यंत पोहोचली नसल्याचे चित्र आहे. शासनाने जाहीर केलेली मदत कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याचा दावा कामगार कार्यालय करीत असले तरी किती कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली, याबाबतची माहिती या विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शक्य तितक्या लवकर ही रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नोंदणी केलेले बांधकाम मजूर - ४२३०७
नोंदणी न केलेले बांधकाम मजूर - १०००
जगायचे कसे ?
शासनाने बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे; मात्र अद्याप ही मदत मिळाली नाही. संचारबंदी काळात रोजगार उपलब्ध नसल्याने जगायचे कसे?
- गौतम पाईकराव
बांधकाम नोंदणी असलेल्या कामगारांनाच दीड हजाराची मदत दिली जाणार आहे. माझी नोंदणी नसली, तरी बांधकाम कामगार म्हणून अनेक महिन्यांपासून काम करतो. शासनाने आम्हालाही मदत करावी.
- धीरज वाठोरे
बांधकाम कामगारांना मदत म्हणून दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय चांगला असता, तरी अद्याप मदत मिळाली नाही.
- नागेश कांबळे