उशिराने येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST2020-12-24T04:26:52+5:302020-12-24T04:26:52+5:30
गोरेगाव : पोलीस ठाण्यात २३ डिसेंबर रोजी उशिराने येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ठाणेदार पोनि ...

उशिराने येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे केले स्वागत
गोरेगाव : पोलीस ठाण्यात २३ डिसेंबर रोजी उशिराने येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ठाणेदार पोनि सुरेश दळवी यांच्या गांधीगिरीतून रोडावलेल्या ठाणे कारभाराला शिस्त लावण्याचा अनोख्या प्रयत्नामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांना चपराक बसली आहे.
गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक, २ पीएसआय या तीन अधिकाऱ्यांसह नियुक्त ३८ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८ जण इतर ठिकाणी संलग्न असून, ठाण्यात एकूण ३० जण कार्यरत आहेत. यापैकी एक दोघांचा अपवाद वगळता इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, तसेच ठाण्यातील निवासस्थानाच्या दुरवस्थेचे कारण आहे. यामुळे मुख्यालयी राहण्याचे टाळले जात आहे. हिंगोलीवरून अप-डाऊन केले जात असताना सकाळी उशिराने हजेरी लावून सायंकाळी ४ वाजेच्या आतच पोबारा करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीअभावी वेळेत हजेरी परेड होत नसून ठाणे कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. वरिष्ठांच्या आदेशाला तिलाजंली देत पोलीस कर्मचाऱ्यांकडून ठाण्यात उशिराने हजेरी लावणे, वारंवार रजा घेणे, गैरहजर राहण्याचे सत्र सुरूच असताना पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ केली जात असून, परस्पर तडजोडीवर भर दिला जात आहे, तसेच फिर्यादीसोबत गैरवर्तनाचा प्रकारदेखील समोर आला होता.
या पार्श्वभूमीवर ठाणेदार पोनि श्रीमनवार यांनी कर्तव्यात लहरी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीच्या नोंदी घेत, तंबी देत वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नव्हते, परिणामी ठाण्याचा कारभार पुरता रोडावला हाेता.
आठवडाभरापूर्वी पोनि सुरेश दळवी यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनमर्जीमुळे रोडावलेला ठाणे कारभार बघता ठाणेदारांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित ठाण्यात उशिराने येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. या प्रकारामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन तत्पर असणे अपेक्षित असताना पोलीस कर्मचाऱ्यांना व ठाणे कारभाराला नव्याने शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ठाणेदारांनी सांगितले.
फाेटाे नं १७