पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:34+5:302021-02-09T04:32:34+5:30

पाणंद रस्ता करण्याची मागणी बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाण्यासाठी पाणंद रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी ...

Wandering of villagers for water | पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

पाणंद रस्ता करण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाण्यासाठी पाणंद रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी व शेतमजुरांतून होत आहे. सध्या असलेला पाणंद रस्ता हा फार बिकट झालेला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूरांना शेताकडे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

हिंगोली : शहरानजीक असणाऱ्या बळसोंड येथील स्टेट बँकेच्या समोरील रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अनेक वाहनधारकांना आपले वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डा चुकवितांना वाहनधारक पडत असल्याचे प्रकारही घडत आहे. यासाठी रस्त्यावरील खड्डे दुरूस्त करावे अशी मागणी होत आहे.

शाळेच्या पाठीमागे उकीरडा

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर अनेक गावकरी केरकचरा टाकीत आहे. यामुळे याठिकाणी उकीरडा निर्माण झाला आहे. आता शाळा सुरू झाल्या असून याचा त्रास शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना होत आहे. यासाठी हा उकीरडा साफ करावा अशी मागणी पालकांतून होत आहे.

रानडुकरांचा उपद्रव वाढला

जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढला आहे. अनेकदा शेतकरी व शेतमजुर काम करीत असताना शेतात रानडुक्कर आढळत आहेत. या रानडुकरांना हाकलण्याचा प्रयत्न करताना अनेकदा ते शेतकरी व शेतमजुरांच्या अंगावर धावत आहे. यामुळे शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कामाच्या शोधात मजुरांचे स्थलांतर

नंदगाव : सध्या गाव व परिसरामध्ये कोणतेही काम मिळत नसल्यामुळे अनेक मजुरांचे कामाच्या शोधात परगावी स्थलांतर होत आहे. कोरोना महामारीमुळे महागाई वाढली असून जेमतेम मिळणाऱ्या पैसातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे अनेक मजूर औरंगाबाद, मुंबई, वसई, पुणे व इतरत्र ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत.

हळदीवर करपा रोगाची लागण

औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे पाने पिवळी पडून करपत असल्याचे दिसत आहे. यामुळे हळद पिकावर आलेल्या करपा रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने त्वरीत मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पथदिवे दुरूस्त करण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा व पिंपरखेड गावातील पथदिवे मागील आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे गावात सायंकाळपासूनच अंधारमय वातावरण निर्माण होत आहे. याचबरोबर गावात अंधार राहत असल्याने भुरटे चोरटे शेतीपयोगी साहीत्य व संसारोपयोगी साहित्य चोरी करीत आहेत. यामुळे पथदिवे दुरुस्त करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.

वाळू अभावी घरकुलांचे कामे खोळंबली

औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक नागरिकांना घरकूल मंजुर झालेली आहेत. पण वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्यामुळे शहरात वाळू मिळत नाही. यामुळे अनेक घरकुलधारकांचे घराचे स्वप्न भंग झाले आहेत. यासाठी वाळू घाटांचा लिलाव व्हावा अशी मागणी घरकूल लाभधारकांतून होत आहे.

बसस्थानकात खाजगी वाहनांमुळे अडथळा

हिंगोली : शहरातील नवीन बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. पण पर्यायी करण्यात आलेल्या बसस्थानक परिसरात ऑटो, कार व इतर खाजगी वाहनांचा वावर होत आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या बसेसना या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत आहे. यासाठी संबंधीतांनी लक्ष देवून खाजगी वाहनांना बसस्थानकात घुसू देवू नये अशी मागणी बसचालकांतून होत आहे.

Web Title: Wandering of villagers for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.