चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरटे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 18:10 IST2021-05-18T18:09:37+5:302021-05-18T18:10:28+5:30
हिंगोली, वाशीम, यवतमाळ, नांदेड आदी शहरातून दुचाकी चोरून कळमनुरी येथे करायचे विक्री

चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरटे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
हिंगोली : चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी कळमनुरीतून ताब्यात घेतले. चोरट्यांकडून दुचाकी चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
हिंगोली, वाशीम, यवतमाळ, नांदेड आदी शहरातून दुचाकी चोरून कळमनुरी येथील शास्त्री नगरातील बजरंग उर्फ आकाश गजानन व्यवहारे याच्या घरासमोरील अंगणात विक्रीसाठी ठेवल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बजरंग उर्फ आकाश गजानन व्यवहारे याच्या घरी तपासणी केली. यावेळी हिरो पॅशन प्रो व बजाज डिस्कव्हर कंपनीच्या आठ दुचाकी आढळून आल्या. त्याला आणखी विचारपूस केली असता बजरंग गजानन व्यवहारे व गजानन अशोक सूर्यवंशी (रा. शेंबाळपिंप्री. ता. पूसद) यांनी हिंगोली, वाशीम, नांदेड, यवतमाळ आदी शहरातून दुचाकी चोरल्याची कबूली दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून दोघांविरूद्ध उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्याात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दुचाकीच्या मूळ मालकांचा शोध घेतला असता ते बोरी खू (ता. पूसद), आईना महल इतवारा नांदेड, नदीग्राम मार्केट नांदेड, इंदिरा गांधी वार्ड उमरखेड, मुचंडी (ता. बेळगाव ) येथील असल्याचे समजले. तर आणखी तीन दुचाकी मालकाची माहिती मिळू शकली नाही.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहा.पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उप निरीक्षक के.डी. पोटे, बालाजी बोके, संभाजी लेकूळे, भगवान आडे, सुनिल अंभोरे, विठ्ठल कोळेकर, शंकर ठोंबरे, विशाल घोळवे, राजू ठाकूर, किशोर सावंत, दीपक पाटील, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, चालक प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.