जीपच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:44+5:302021-01-08T05:37:44+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील महादेववाडी भागातील शुभम प्रकाश कलकोटी व रोहन लुणकरण शर्मा हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ...

जीपच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील महादेववाडी भागातील शुभम प्रकाश कलकोटी व रोहन लुणकरण शर्मा हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या विना क्रमांकाच्या दुचाकीवर हिंगोलीकडून औंढा नागनाथ रोडकडे जात होते. त्यांचे दुचाकी वाहन नर्सी टी पॉईंटजवळ असताना समोरील जीपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांनी दुचाकी पुढे नेली. मात्र समोरून अचानक वाहन आल्याने त्यांनी दुचाकीचे ब्रेक लावले. यामुळे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपला (क्र. एमएच-३८-व्ही.२१२५) धडक बसली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार रविकांत हरकाळ, गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमी असलेल्या दोघांनाही उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविले तसेच हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, जखमी दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
अपघातग्रस्त जीप वसमतच्या पंचायत समिती कार्यालयाची असून ती पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आली होती. तसेच चालकासही ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी पंचायत समितीचे कर्मचारी हिंगोलीत आले होते. त्यानंतर परत जाताना हा अपघात झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बंदखडके यांनी सांगितले.