रेशन दुकानातून तूरडाळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:53+5:302021-02-05T07:52:53+5:30
हिंगोली : जिल्ह्यात काही दिवसांपासून रेशन दुकानातून तूरडाळ देणे बंद झाले आहे. केवळ गहू व तांदूळ दिला जात असून, ...

रेशन दुकानातून तूरडाळ गायब
हिंगोली : जिल्ह्यात काही दिवसांपासून रेशन दुकानातून तूरडाळ देणे बंद झाले आहे. केवळ गहू व तांदूळ दिला जात असून, अंत्योदय योजनेतील लाभार्थींना गहू व तांदूळ यासह साखर मिळत असली तरी तूरडाळ मिळत नसल्याने लाभार्थींतून नाराजीचा सूर उमटत आहे.
गरजू लाभार्थींना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे यासाठी रेशन दुकानांमार्फत धान्य वितरित केले जाते. जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गतचे २६ हजार ३५९ लाभार्थी आहेत. तसेच अन्नसुरक्षा योजनेचे एक लाख ३१ हजार ८३८ लाभार्थी असून, ३० हजार ७७६ लाभार्थी शेतकरी योजनेतील आहे. एकूण एक लाख ८८ हजार ८७३ लाभार्थींना रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्याचा पुरवठा केला जातो. अंत्योदय योजना वगळता इतर दोन योजनेतील लाभार्थींना गहू व तांदूळ उपलब्ध करून दिला जातो, तर अंत्योदय योजनेतील लाभार्थींना गहू व तांदूळसह साखरही देण्याचा प्रयत्न केला जातो. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हातचा रोजगार गेला होता. या काळात शासनाने गहू, तांदूळ यासह तूरडाळही देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गत महिन्यापासून रेशन दुकानातून तूरडाळही गायब झाल्याच्या तक्रारी लाभार्थींतून येत आहेत. दिवाळी सण लक्षात घेऊन तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली होती. सध्या वरिष्ठ स्तरावरून तूरडाळ देण्यासंदर्भात कोणत्याही सूचना नसल्याचेही पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
जिल्हाभरातच तूरडाळ मिळत नसल्याच्या तक्रारी
शासनाच्या वतीने सण, उत्सव लक्षात घेऊन तूर व चना डाळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला; मात्र गत महिन्यापासून रेशन दुकानातून तूरडाळही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. केवळ गहू व तांदूळ वगळता इतर कोणतीही डाळ मिळाली नसल्याचे लाभार्थी सांगत आहेत.
रेशनवर काय मिळते ?
जिल्ह्यात पूर्वी गहू, तांदूळ, साखर यासह खाद्यतेलही रेशन दुकानातून मिळत होते. मात्र, कालांतराने यात बदल होत गेला. सध्या रेशन दुकानातून गहू व तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थींना गहू, तांदूळ यासह साखर दिली जात असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
एकूण रेशन कार्डधारक
१८८८७३
अंत्योदय कार्डधारक
२६३५९
अन्नसुरक्षा कार्डधारक
१३१८३८
शेतकरी कार्डधारक
३०७७६