खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:04+5:302020-12-29T04:29:04+5:30
आखाडा बाळापूर : ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी स्वतंत्र बँक खाते काढण्याच्या अटीच्या पूर्ततेसाठी आज बाळापुरातील सर्वच बँकांमध्ये तोबा गर्दी झाली. ...

खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये तोबा गर्दी
आखाडा बाळापूर : ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी स्वतंत्र बँक खाते काढण्याच्या अटीच्या पूर्ततेसाठी आज बाळापुरातील सर्वच बँकांमध्ये तोबा गर्दी झाली. खाते उघडणारे आणि किसान पेन्शन योजनेच्या जमा झालेल्या रकमेचे आकडे पाहण्यासाठी सर्वच बँका हाऊसफुल झाल्या. बाळापूर व परिसरातील नागरिकांनी तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांमध्ये केलेली गर्दी बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरली.
ग्रामपंचायत निवडणुकीचा माैसम रंगात आला आहे. ज्याला त्याला निवडणूक लढवण्याचे डोहाळे लागलेत. ग्रा. पं. सदस्यत्व निवडणूक अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र बँक खात्याची गरज आहे. त्यातच बँकांना तीन दिवसांची सलग सुटी आल्यामुळे अनेक इच्छुकांची फजिती झाली. त्यामुळे आज सकाळपासूनच नवीन खाते उघडण्यासाठी इच्छुकांनी बँकांमध्ये गर्दी केली. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्वच बँकांच्या शाखांमध्ये गर्दी पाहावयास मिळाली. प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेचा दोन हजार रुपये हप्ता बँकेत जमा झाल्याची वार्ता कळाल्याने आपल्या खात्यावरील रक्कम उचलण्यासाठी व आकडेवारी पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती, तर इच्छुक ग्रामपंचायत सदस्यांनी खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. तीन दिवसांच्या सुटीनंतर बँका उघडल्यानंतर व्यापारी व ग्राहकांनीही गर्दी केल्याने दिवसभर गर्दी पाहावयास मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तर सायंकाळी पाच वाजतासुद्धा अनेक लोक रांगेत उभे असल्याचे चित्र होते. बँकांमध्ये झालेली गर्दी गेल्या अनेक दिवसांनंतर पाहावयास मिळाली असली तरी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र त्याची मोठी डोकेदुखी झाली आहे.
..................फाेटाे नं २८