उन्हाळी फळे दाखल, मागणीही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:14 IST2019-03-30T00:13:36+5:302019-03-30T00:14:16+5:30
व्यवहार मंदावल्याने मरगळलेल्या फळ बाजारात आता उन्हाळी फळांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. काही फळांचे दर भडकले तर काहींचे उतरले असून ज्युससाठीही वेगळी विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

उन्हाळी फळे दाखल, मागणीही वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : व्यवहार मंदावल्याने मरगळलेल्या फळ बाजारात आता उन्हाळी फळांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. काही फळांचे दर भडकले तर काहींचे उतरले असून ज्युससाठीही वेगळी विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यंदा थंडीचा मोसम लांबल्याने फळ विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसत होता. फळांची विक्री कमालीची मंदावली होती. थंडीमुळे सर्दी, खोकला आदी आजारांच्या भीतीने लहान मुले व वृद्धांना फळे देणेच टाळले जात होते. शिवाय ज्युस सेंटरही तेवढे चालत नसल्याने फळांना फारसी मागणी होत नव्हती. मात्र आता तापमान ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे आता ग्राहकांची पावले ज्युस सेंटर, रसवंतीगृहाकडे वळत आहेत. शिवाय अनेकजण बाजारातून थेट फळे खरेदी करताना दिसत आहेत. तर बाजारात आलेली ही गती लक्षात घेता फळांचे हातगाडेही मोठ्या प्रमाणात वाढले असून नियमित दुकाने थाटून बसणाऱ्या विक्रेत्यांकडेही वाढीव माल दिसत आहे.
याबाबत फळ बाजाराचा फेरफटका मारला असता काही फळांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर काहींचे भाव उतरले आहेत. मात्र एकंदर नेमकाच फळांना उठाव मिळत असल्याने अजून तेजी आली नसल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा कडाका असाच राहिला अन् मागणी वाढली तर दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पुरवठाही अपेक्षित प्रमाणात होत असल्याने तूर्त असे होण्यासारखी परिस्थिती नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.