पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 17:58 IST2021-12-21T17:57:41+5:302021-12-21T17:58:58+5:30
२० जुलै २०१८ रोजी शेर ए पंजाब धाबा जरोडा फाटा येथे एका कंटेनरमध्ये मृतदेह असल्याची माहिती धाबामालक सरजितसिंग जग्तारसिंग संधू यांनी दिली होती.

पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा
हिंगोली : लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कंटेनरचा धक्का देऊन सोबतच्याच एकाचा खून केल्याच्या प्रकरणात ट्रकचालक बलवान जोधाराम यास जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयाने जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.
२० जुलै २०१८ रोजी शेर ए पंजाब धाबा जरोडा फाटा येथे एका कंटेनरमध्ये मृतदेह असल्याची माहिती धाबामालक सरजितसिंग जग्तारसिंग संधू यांनी दिली. त्यानुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी नागनाथ दीपक यांनी घटनास्थळी भेट देऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र मृत बलवान हवासिंग (वय २९ रा. कुपजानगर, पिंचोपा, कलनदादरी जि. भिवाजी, राज्य हरियाणा) यांच्या अंगावर खरचटलेले दिसत होते. ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे शवविच्छेदन केले असता, छातीत जोरदार प्रहार केल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाला. २१ जुलै रोजी प्रत्यक्षदर्शी विठ्ठल चांदराव भिसे व ग्रीस भरणारा कामगार साहेबराव मस्के यांना विचारणा केली असता, कंटेनरजवळ दोघेजण भांडत असल्याचे पाहिले होते, असे त्यांनी सांगितले.
१९ जुलै रोजी दुपारी अंदाजे ४ वाजेच्या सुमारास या धाब्यावर कंटेनर क्रमांक जीजे १४ डल्यू २८२७ मधील केबिनमध्ये मृत बलवान हवासिंग यास त्याच्याच गावचा रहिवासी असलेला आरोपी बलवान जोधाराम हा लाथा घालून मारहाण करीत असल्याचे पाहिले होते. त्यानंतर तपासात कंटेनर क्र. जीजे ०६ एझेड १७२८ मध्ये असताना या दोघात मृताच्या पत्नीस अश्लील बोलण्यावरून वाद झाला. यात जोधारामने बलवान हवासिंग याच्या छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कंटेनरच्या खाली ढकलून दिले. बलवान हवासिंग जमिनीवर पडून उठल्यानंतर कंटेनर सुरू करून कंटेनरचा धक्का देत त्यास खाली पाडले. त्यानंतर बलवान हवासिंग यास कंटेनर क्रमांक जीजे १४ डब्ल्यू २८२७ च्या केबिनमध्ये ढकलून दिले. यात त्याचा मृत्यू झाल्याचे समाेर आले.
तत्कालीन फौजदार तानाजी चेरले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी आरोपी बलवान जोधाराम यास दोषी ठरवून जन्मठेप व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. एस. डी. कुटे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. एन. एस. मुटकुळे, ॲड. एस. एस. देशमुख यांनी सहकार्य केले.