सोयाबीन आवक मंदच, हमी केंद्रही ओसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:14 IST2018-11-17T00:14:04+5:302018-11-17T00:14:12+5:30
यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहेरचे दरच वाढल्याने तेही ओस पडले आहेत.

सोयाबीन आवक मंदच, हमी केंद्रही ओसच
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहेरचे दरच वाढल्याने तेही ओस पडले आहेत.
मागील काही वर्षांपासून शेतीमालाला भाव नसल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. हमीभावापेक्षाही कमी दराने मोंढ्यात मालाची खरेदी होत असल्याची ओरड करून शेतकरी नाफेडच्या हमीभाव केंद्रावर गर्दी करीत होते. मात्र शेतकऱ्यांना त्याचा अनुभव फारसा चांगला आला नाही. यात मालाची आॅनलाईन नोंदणी, त्यानंतर माल विक्रीसाठी प्रतीक्षा, त्यानंतर धनादेशासाठी चकरा असा तीन ते चार महिन्यांचा काळ जात होता. त्यामुळे या केंद्राकडे पाठ फिरवून अनेकांनी मोंढ्यात कमी दराने आपला माल विकणे पसंत केले होते. यंदा मात्र दुष्काळामुळे चित्र बदलले आहे. हरभºयाचे दर तर आता पुढील हंगाम येण्यापूर्वीच वधारलेले आहेत. सोयाबीनही हमीभावापेक्षा जास्त दराने विकले जात आहे. ३ हजार ५00 रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आॅईल मिल, बियाणे महामंडळ व व्यापारी अशा तिन्हींकडून मागणी असल्याने शेतकºयांना अजून दरवाढीची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी काहीकाळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. तूर्तही शेतकरी आपली तात्पुरती गरज भागविण्याइतकाच माल मोंढ्यात आणत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दिवसांत रोज जवळपास आठ हजार क्विंटलपर्यंत येणारा माल आता दीड ते दोन हजार क्विंटलांवर आला आहे. बहुतांश भागात दुष्काळामुळे उताराही घटलेला आहे. यामुळे यंदा व्यापाºयांतही स्पर्धा व निराशा दोन्ही असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदा हमीभाव केंद्रांवर माल देणाºया शेतकºयांना आठ दिवसांत रक्कम मिळेल, अशी प्रणाली शासनाने निर्माण केली. मात्र तेथील दरच कमी असल्याने शेतकरी थेट मोंढ्याकडे वळला आहे. त्यामुळे नोंदणी केलेला मालही हमीभाव केंद्रावर जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अचानकच ही परिस्थिती बदलल्याचे जाणवत आहे.