सौरउर्जा दिव्यांचे खांब होताहेत जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST2021-01-08T05:38:02+5:302021-01-08T05:38:02+5:30
वसमत येथे पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्रीमार्कण्डेय महाराज यांचे मंदिर आहे. मंदिरात सौरऊर्जा दिव्यांचे दोन खांब बसविण्यात ...

सौरउर्जा दिव्यांचे खांब होताहेत जमीनदोस्त
वसमत येथे पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्रीमार्कण्डेय महाराज यांचे मंदिर आहे. मंदिरात सौरऊर्जा दिव्यांचे दोन खांब बसविण्यात आले आहेत; परंतु खांबावर दिवेच नाहीत. दोन्ही खांब जमिनीत फाउंडेशन न करता भिंतीला तारांनी बांधून उभे करण्याचा अजब प्रकार घडलेला आहे. विनाफाउंडेशन, विनादिव्यांचे खांब चक्क मंदिरात बसविण्यात आले कसे? हाच प्रश्न निर्माण होत आहे. तरीही तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी गुत्तेदाराला आरटीजीएसद्वारे देयके अदा केली आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामाची देयके काढण्याची घाई का झाली? हे आता समोर येत आहे.
मार्कण्डेय मंदिरात बसवलेल्या विनादिव्यांच्या व विनाफाउंडेशनच्या खांबांपैकी एक खांब जमीनदोस्त झाला आहे. मंदिरात फक्त दिखाव्यासाठीच हे दोन खांब उभे करण्यात आले होते. चार कोटी रुपये खर्च केलेल्या सौरऊर्जा दिव्यांच्या अनेक खांबांवर दिवे नाहीत. काही ठिकाणी पॅनल नाहीत. पॅनल व दिवे असले तरी व काही खांबांवरील दिव्यांचा उजेडही पडत असला तरी अनेक खांबांवरील दिव्यांचा उजेड पडत नाही. त्याची चौकशीही सुरू असून, चौकशीदरम्यानच खांब जमीनदोस्त होत असल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे.
बदलीवर गेलेले मुख्याधिकारी अशोक साबणे यांच्या कारभाराचा हा एक नमुना असल्याचे बोलले जात आहे. खांबावर दिवे नाहीत, फाउंडेशन नाही तरी देयके अदा करण्याचा प्रकार घडला. चौकशी सुरू होताच मुख्याधिकारी बदलीवर गेले. आता सुटका झाली म्हणून ते निवांत झाले असले तरी जमीनदोस्त होत असलेल्या खांबांमुळे पुन्हा ते चर्चेत आले आहेत.