स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:38+5:302021-01-08T05:37:38+5:30
शासनाने सरसकट पिक विमा देण्यात यावा तसेच जिल्हा व तालुका तक्रार समिती माहिती जिल्हा कृषी कार्यालय येथे लावण्यात यावी, ...

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
शासनाने सरसकट पिक विमा देण्यात यावा तसेच जिल्हा व तालुका तक्रार समिती माहिती जिल्हा कृषी कार्यालय येथे लावण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षापासून शेतकरी विविध कंपन्यामध्ये पिक विमा भरत आहेत. मात्र सलग तीन वर्षे नुकसान झाल्यानंतरही ‘पिकविमा कंपन्या’ शेतकऱ्यांना पीक विमा परतावा देत नसून शेतकऱ्यांची केवळ थट्टा करीत आहे. त्यामुळे तीन वर्षापासूनचा विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिक विमा परताव्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी जिल्हा कृषी अधीक्षक लोखंडे यांना धारेवर धरले होते. वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा पावित्रा आंदोलकांनी घेतला होता. बऱ्याच वेळानंतर कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत निश्चित होणारी नुकसानभरपाई ही शासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. त्यानुसार विमा संबंधित मंडळास लागू करण्यात येईल. सदर हंगामातील सोयाबीन पिकांचे संकलन नोंदवही कृषी आयुक्तलयास सादर केली आहे. तसेच सन २०१९- २० मधील पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांची यादी बजाज अलायन्स कंपनीस पाठविण्यात आली आहे. व नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीचे राहील. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची यादी पाठविण्यात येईल असे पत्र आंदोलकांना कृषी अधीक्षकांनी दिले आहे.
संघटनेतर्फे यापूर्वीच दिला होता आंदोलनाचा इशारा
याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांना यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन पिक विमा परताव्याची मागणी केली होती. शिवाय आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता. परंतु मागणी मान्य न झाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गाडे, रावसाहेब अडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, नारायण सावके, बाबुराव मगर, दीपक सावके माधव सावके यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.