जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:44+5:302021-02-05T07:52:44+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळत बस, रेल्वे यासह विमानसेवा सुरू झाली ...

जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळत बस, रेल्वे यासह विमानसेवा सुरू झाली आहे. तसेच सर्व व्यवहारही सुरळीत झाले आहेत. मात्र महाविद्यालये सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोनामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विविध शाखांच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात होता. सध्या काही महाविद्यालयातून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी अनेक भागात नेटवर्कचा प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. तसेच ऑनलाइन अभ्यास कंटाळवाणा वाटत असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता महाविद्यालये कधी सुरू होणार याकडेच पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
९९ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर ही जिल्हे येतात. चार जिल्ह्यात मिळून कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक शास्र, पत्रकारिता आदी शाखा असलेली जवळपास ३६० महाविद्यालये आहेत. यात ९९ हजार ५००च्या वर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध अभ्यासक्रम शिकविणारे ३७ महाविद्यालये आहेत. कोरोनामुळे बंद असलेली ही महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
महाविद्यालये बंद असल्याने अभ्यास बुडत आहे. महाविद्यालयाकडून ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ऑनलाइन अभ्यास समजण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू व्हावीत.
- प्रशांत कऱ्हाळे, विद्यार्थी
जिल्ह्यातील शाळा यासह इतर व्यवहारही सुरू झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयेही सुरू व्हायला पाहिजेत. ग्रामीण भागात नेटवर्क राहत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्याकडे ॲण्ड्राइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन अभ्यासही करता येत नाही.
-विनायक डांगे, विद्यार्थी
ऑनलाइन अभ्यास कंटाळवाणा ठरत आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकविलेले जास्त लक्षात राहते. शाळा सुरू झाल्या तसेच बसेसही धावत आहेत. महाविद्यालये सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचा अभ्यासही पूर्ण होईल.
- कैलास मुकाडे, विद्यार्थी
महाविद्यालये बंद असल्याने देशाचे भविष्य असलेली युवापिढीच्या क्षमतांना वाव मिळण्यास अडथळा ठरत आहे. नियम पाळून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. तरीही महाविद्यालये बंद ठेवून शासनाला नेमके काय सिद्ध करायचे. महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश तातडीने काढावेत.
- सौरभ करंडे, विद्यार्थी