एस. टी. चालक - वाहकांना मास्कचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST2021-03-16T04:30:40+5:302021-03-16T04:30:40+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना एस. टी. महामंडळाच्या चालक - वाहकांना मात्र याचे काहीही कसे वाटत ...

एस. टी. चालक - वाहकांना मास्कचे वावडे
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना एस. टी. महामंडळाच्या चालक - वाहकांना मात्र याचे काहीही कसे वाटत नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. चढताना अन् उतरताना कोणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील दीड - दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आतापर्यंत कोरोनाचे ६५ रुग्ण आढळून आले असताना एस. टी. महामंडळाच्या चालक - वाहकांना काहीच कसे वाटत नाही? हे बसस्थानकातील सद्यस्थितीवरुन पाहायला मिळत आहे. गत पंधरा दिवसांचा आढावा घेतला तर १ मार्च रोजी ३२ रुग्ण, २ रोजी २४ रुग्ण, ३ रोजी ५६ रुग्ण, ४ रोजी ३६ रुग्ण, ५ रोजी ४४ रुग्ण, ६ रोजी ४६ रुग्ण, ७ रोजी २७ रुग्ण, ८ रोजी ५५ रुग्ण, ९ रोजी ३४ रुग्ण, १० रोजी ४४ रुग्ण, ११ रोजी ४३ रुग्ण, १२ रोजी ७१ रुग्ण, १३ रोजी ४९ रुग्ण, १४ रोजी ६७ रुग्ण आणि १५ मार्च रोजी ४४ रुग्ण नव्याने निर्माण झाले आहेत. १ ते ७ मार्च या कालावधीत बसस्थानकातील अँटिजेन तपासणीत २९ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. असे असताना चालक - वाहक मात्र बिनधास्तपणे बसेस चालवित आहेत. एवढेच काय प्रवाशांमध्ये प्रवास करताना दिसून येत आहेत. खरे पाहिले तर चालक - वाहकांनी बसमधील प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरबाबत सूचना द्यायला पाहिजे. स्वत:ही त्याचा पुरेपूर वापर करायला पाहिजे. परंतु, तसे काही होताना दिसून येत नाही. बसमध्ये चढतेवेळेस तर कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही. कोरोनाची भीती कशी काय वाटत नाही? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत असताना चालक - वाहकांना त्याचे काहीच वाटत नाही. उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या एस. टी. महामंडळाच्या चालक - वाहकांनी याचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. दुसरीकडे फोकल पाईंटवालेही बिनधास्तपणे प्रवाशांना सूचना करायची सोडून स्वत:ही विनामास्क बसस्थानकात वावरताना पाहायला मिळत आहेत.
‘...त्या’ सूचनांचे झाले काय?
मध्यंतरी एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चालक - वाहक तसेच कर्मचाऱ्यांना विनामास्क फिरु नका, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचनाही दिल्या होत्या. परंतु त्या सूचना अजून तरी अंमलात आणलेल्या दिसत नाहीत. एक-दोन चालक - वाहक सोडले तरी बाकी सारे सुचनांचे पालन का करत नाहीत, हा यक्ष प्रश्न आहे. महामंडळाच्या वरिष्ठांनी प्रवाशांना तसेच चालक - वाहकांना मास्कबाबत कडक सूचना देणे गरजेचे आहे.