सात दिवसांच्या संचारबंदीत एस. टी. महामंडळाला ९३ लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST2021-03-13T04:54:25+5:302021-03-13T04:54:25+5:30
हिंगोली : जिल्ह्यात १ ते ७ मार्चदरम्यान सात दिवसांच्या कालावधीत तिन्ही आगारांतील एस. टी. बसेस बंद असल्यामुळे महामंडळाला ९३ ...

सात दिवसांच्या संचारबंदीत एस. टी. महामंडळाला ९३ लाखांचा फटका
हिंगोली : जिल्ह्यात १ ते ७ मार्चदरम्यान सात दिवसांच्या कालावधीत तिन्ही आगारांतील एस. टी. बसेस बंद असल्यामुळे महामंडळाला ९३ लाखांचा फटका बसला. या दरम्यान, व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने माल वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने २४ फेब्रुवारी रोजी आदेश काढून सकाळी सात ते सायंकाळी सात अशी संचारबंदी घोषित केली होती. तरीही रुग्ण आढळून येत होते. यानंतर रुग्ण वाढत असल्याचे पाहून लगेच १ ते ७ मार्च अशी टाळेबंदी जाहीर केली. दरम्यान, महामंडळाला तसे पत्र देऊन एस. टी. बसेसही बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी येथील सर्वच बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या.
हिंगोली आगारात आजमितीस ५७ बसेस, वसमत आगारात ५३ बसेस तर कळमनुरी आगारात ३१ बसेस कार्यरत आहेत. संचारबंदीच्या काळात आगारातून सुटणाऱ्या बसेस बंद असल्या तरी परजिल्ह्यातून येणाऱ्या बसेस मात्र सुरूच होत्या. या दरम्यान, चालक-वाहकांना कामे नसल्यामुळे त्यांना महामंडळातील अंतर्गत कामे देण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्वच ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत असल्याचे महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
बॉक्स
प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन
जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. कोरोनाचा आकडा दोनअंकी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करतेवेळेस स्वत:बरोबर इतरांची काळजी घेत मास्कचा उपयोग करावा. तसेच सॅनिटायझर सोबत ठेवावे. बसमध्ये चढतेवेळेस सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहनही एस. टी. महामंडळाच्यावतीने प्रवाशांना करण्यात आले आहे.
बॉक्स
चालक-वाहकांना दिली सूचना
कोरोना आजार वाढू लागल्याने प्रवाशांनी मास्क घातल्याशिवाय प्रवास करू नये, अशी सूचना महामंडळ करीत आहे. त्याचबरोबर चालक-वाहकांनाही मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, एस. टी. आगारातून काढतेवेळेस धुवून घ्या, एस. टी. मध्ये साफसफाई करा, अशा सूचना चालक-वाहकांना दिल्या आहेत.
-रा. य. मुपडे, आगारप्रमुख वसमत