लक्ष दुसरीकडे गेले अन चोरी झाली; कारमध्ये हवा भरताना शिक्षकाचे १ लाख रुपये पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 17:49 IST2021-11-09T17:37:42+5:302021-11-09T17:49:28+5:30
वसमत शहरातून कारमधील पिशवी पळविली

लक्ष दुसरीकडे गेले अन चोरी झाली; कारमध्ये हवा भरताना शिक्षकाचे १ लाख रुपये पळवले
वसमत : शहरातील ठक्कर कॉम्प्लेक्स भागात कारच्या टायरमध्ये हवा भरताना, कारमधील १ लाख रुपये असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना ९ नाेव्हेंबर राेजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी शिक्षकाने पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराचे कथन करताच पोलिसांनी शाेध मोहीम राबविली.
वसमत शहरात ९ नोव्हेंबर राेजी पांग्रा शिंदे येथील शिक्षक शिंदे यांनी एसबीआय बँकेतून १ लाख रुपये काढले व ते त्यांच्या कारमध्ये ठेवले. यादरम्यान ठक्कर कॉम्प्लेक्स भागात कार उभी करून हवा भरत असताना अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये असलेली पिशवी पळविली. या घटनेची माहिती शिक्षकाने वसमत शहर पोलिसांना देताच, घटनास्थळी जमादार शे. हकीम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चाेरट्याचा आठवडी बाजार, नवीन बसस्थानक यासह इतरही परिसरात शोध घेतला. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. शहरात एकाच दिवशी दिवसा चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. दुचाकी, चारचाकी, घरफाेडीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांत दहशत निर्माण झाली असून, पाेलिसांचा वचक राहिला नसल्याने हे प्रकार घडत आहेत.