Reasons for asking for a subscription | वर्गणी मागण्याच्या कारणावरून हाणामारी
वर्गणी मागण्याच्या कारणावरून हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : शहरात गणपतीची वर्गणी मागण्याच्या कारणावरून एका मेडिकल व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे सेनगाव शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गणपतीची वर्गणी का देत नाही या कारणावरून सेनगाव येथील मुख्य रस्त्यावरील श्री गणराज मेडिकलचे व्यावसायिक अमोल शिंदे यांना युवकांच्या एका टोळक्याने जबर मारहाण केली. काही वेळाने यातून दोन गटांत वाद होऊन लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. हाणामारीच्या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. हाणामारी जवळपास अर्धा तास सुरू होती. त्यामुळे याठिकाणी मोठा जमाव जमला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याप्रकरणी दोन्ही गटांतील तक्रारींवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. नासधूस केलेल्या मेडिकल दुकानाला पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव यांनी भेट देऊन पंचनामा केला. श्री गणेशाच्या स्थापनेपूर्वीच वर्गणी मागण्यावरून झालेल्या हाणामारीने शहरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे आगामी काळात अशा घटना घडू नयेत, याकरिता शांतता समितीच्या बैठका, विनापरवाना गणेश मंडळांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे.


Web Title:  Reasons for asking for a subscription
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.