राजस्थान येथील मुलगा हिंगोलीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:18 IST2018-06-24T01:18:00+5:302018-06-24T01:18:47+5:30
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात २२ जून रोजी आढळलेला १0 वर्षाचा मुलगा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचा पत्ता सापडला. माधोपूरचे पोलीस अधिकारी व बालकाचे नातेवाईक लवकरच हिंगोलीला त्याला नेण्यासाठी येणार आहेत.

राजस्थान येथील मुलगा हिंगोलीत सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात २२ जून रोजी आढळलेला १0 वर्षाचा मुलगा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचा पत्ता सापडला. माधोपूरचे पोलीस अधिकारी व बालकाचे नातेवाईक लवकरच हिंगोलीला त्याला नेण्यासाठी येणार आहेत.
शुक्रवारी परळी-अकोला या ट्रेनमध्ये हा बालक आढळून आला. बालकासोबत कोणी नातेवाईक दिसत नाहीत, तो एकटाच ट्रेनमधून प्रवास करीत असल्याने रेल्वेतील प्रवासी रवींद्रसिंह राजपूत यांनी या बालकाची माहिती हिंगोली रेल्वे पोलिसांना दिली. या बालकास जीआरपी गणेश जाधव यांच्या स्वाधीन करण्यात आले. जाधव यांनी मुलाची विचारपूस केली, असता हरविलेला बालक बन्टी असे नाव सांगत आहे. तसेच राजस्थान येथून ट्रेनमध्ये बसल्याचेही तो सांगत आहे. त्यावरून जीआरपी जाधव यांनी सदर बाब नांदेड पोलिसांना कळविली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क केला असता, सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर सिटी पोलीस ठाण्यात बन्टी नावाचा बालक हरविल्याची तक्रार दाखल आहे. गंगापूर ठाण्यातील पीएसआय उर्मिला मीना व या बालकाचे नातेवाईक हिंगोलीला येत आहेत. ओळख पटल्यानंतर बन्टीला त्यांच्या स्वाधीन केले जाईल, असे पोकॉ जाधव यांनी सांगितले.
लहान मुले पकडून नेणाऱ्या टोळ्या फिरत असल्याच्या संदेशांमुळे एकीकडे पालक हैराण होत आहेत. तर दुसरीकडे शेकडो किमी अंतरावरील बालक याच व्हॉटस्अॅप संदेशांमुळे नातेवाईकांना पुन्हा सापडत आहे. त्यामुळे नागरिकांनी या माध्यमाचा चांगला उपयोग करायचे ठरवले तर किती चांगले काम हातून घडू शकते, हे दिसून येत आहे.
पोलिसांनी घेतली मुलाची काळजी
४हिंगोली स्थानकात आढळून आलेला मुलगा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असताना बालकास नवीन कपडे देण्यात आले. हा बालक घारबलेला असल्याने तो प्रथम काहीही बोलण्यास तयार नव्हता. जीआरपी जाधव यांनी बालकास जेवण व नवीन कपडे दिले. त्यानंतर बालकाच्या मनातील भीती काहीसी दूर झाली. जाधव यांना दीपक धांडे यांनीही मदत केली. या बालकाची नोंद हिंगोली रेल्वे पोलिसांत केली आहे. बालकाची पुढील काळजी व सुरक्षिततेसाठी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये बालकास बालगृहात ठेवण्यात आले आहे. बालकास सोमवारी नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाईल, असे समितीचे सदस्य अॅड. संभाजी माने यांनी सांगितले.