हिंगोली : अतिवृष्टीच्या माऱ्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला असताना पीकविमा कंपन्यांकडून मात्र पिकांची काढणी पश्चात विमा देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. यावरून संताप व्यक्त करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी शहरातील राज्य राखीव पोलिस बल गट परिसरातील विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.
जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून अतिवृष्टीचा मारा होत आहे. परिणामी, अनेकवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. नदी, नाल्याकाठची पिकांसह जमिनी खरडल्या. बहुतांश भागातील पिके पाण्याखाली गेल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना लागवड वसूल होणेही अवघड आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असताना विमा कंपनीने मात्र पीक नुकसानीकडे ढुंकूनही पाहिले नाही. शिवाय पिकांच्या काढणी पश्चात सर्वेक्षण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. यावरून बुधवारी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत विमा कंपनी कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड केली.
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट...विमा कंपन्या शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. शेतकऱ्यांकडून विमा भरून घेण्यात येतो. परंतु, नुकसानीनंतर भरपाई देण्यास टाळाटाळ होते. यंदा अतिवृष्टीत सर्वकाही होत्याचे नव्हते झाले असताना विमा कंपन्यांकडून मात्र हात वर करण्यात येत आहेत. हे चुकीचे असून, याकडे सरकारने लक्ष देवून शेतकऱ्यांना विमा द्यावा.- नामदेव पतंगे, जिल्हाध्यक्ष, क्रांतीकारी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारची डोळेझाक...अतिवृष्टीत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे पिकांसह जमीन खरडली आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, ते भरून निघणार नाही. त्यामुळे सरकारने विमा कंपन्यांना विमा देण्याचे आदेशित करणे गरजेचे आहे. शिवाय शेतकऱ्यांना भरीव मदत देणेही गरजेचे आहे. अन्यथा क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.- गजानन काळे, कार्यकर्ता, क्रांतीकारी शेतकरी संघटना
Web Summary : Frustrated Hingoli farmers vandalized an insurance office after crop losses due to excessive rain. Despite significant damage to crops like soybean and cotton, insurance companies delayed payouts, sparking outrage and protests by Krantikari Shetkari Sanghatana.
Web Summary : हिंगोली में अत्यधिक बारिश से फसल बर्बाद होने पर किसान भड़क गए। सोयाबीन और कपास जैसी फसलों को भारी नुकसान हुआ, लेकिन बीमा कंपनियों ने भुगतान में देरी की, जिससे क्रांतिकारी शेतकरी संघटना ने विरोध प्रदर्शन किया।