लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मानवी जीवनात माणूस शरीराला खुप जपतो. पण मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी अवयवदान करावे या संबंधीची जनजागृती शाळाशाळांमध्ये जाऊन करण्यात आली. मुंबई येथील अवयवदान महासंघाची पदयात्रा बाळापूर येथे दाखल झाली असून ठीक ठिकाणी या महासंघाचे कार्यकर्ते अवयवदानाचे महत्त्व सांगत आहेत.ही पदयात्रा दिनांक ८ डिसेंबर रोजी आखाडा बाळापुरात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी ते जनजागृती करीत आहेत. आखाडा बाळापूर येथील जि.प. हायस्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल व इतर शाळांमध्ये जाऊन अवयव दानाबाबत माहिती देत आहेत. अवयवदान महासंघाचे प्रियदर्शन बापट ,वसंत चिकोडे, अविनाश कुलकर्णी, सुनील देशपांडे, चंद्रशेखर देशपांडे, शैलेश देशपांडे व सहकारी अवयवदानाचे महत्त्व, गरज व फायदे सांगून जनजागृती करत आहेत.अवयवदानासंबंधीची भीती व गैरसमजही दूर करत आहेत. जिवंत असताना माणसाने शरीरावर प्रेम करावे, परंतु मृत्यूपश्चात या शरीराची विल्हेवाट लावली जाते. परंतु अवयवदान जर केले तर इतरांना हे सुंदर जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. आपण त्याच्या रूपाने जिवंत राहतो, असेही ते व्याख्यानात सांगत होते.
अवयवदानाबद्दल शाळांमध्ये जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:54 IST