जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी ; हळद, आंब्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:00+5:302021-05-08T04:31:00+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास वसमत येथे पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जवळा बाजार, औंढा, पिंपळदरी, डिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, नांदापूर, डाेंगरकडा, ...

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी ; हळद, आंब्याचे नुकसान
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास वसमत येथे पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जवळा बाजार, औंढा, पिंपळदरी, डिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, नांदापूर, डाेंगरकडा, नर्सी, नांदापूरसह अनेक गावांत पावसाने हजेरी लावली हाेती. सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी, तसेच हळद काढणीसह वाळवत टाकल्याचे कामे सुरू हाेती. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांची धांदलघाई झाली हाेती. तसेच नंतर आलेल्या पावसामुळे हळद भिजली आहे. तसेच ताेडणीला आलेल्या आंब्यांची वाऱ्यामुळे गळती झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली शहरानजीकच्या लिंबाळा एमआयडीसीमध्ये तर सीसीआयला भाड्याने दिलेल्या एका खासगी गोदामाची भिंत वीज पडल्याने वादळी वाऱ्यात कोसळली. त्यामुळे आतमधील माल थेट उघड्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
डिग्रस कऱ्हाळे परिसरात हळदीचे नुकसान
७ मेच्या दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास डिग्रस कऱ्हाळे परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शिजवून ठेवलेली हळदी भिजली आहे. तसेच आंब्यांची गळती झाली असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कधी अतिवृष्टी, दुष्काळ, नापिकी यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली असून विद्युत तारा तुटल्या आहेत. विजेचे खांब रस्त्यावर पडले आहेत.