गहू कमी करून मका देण्यात येणार; मार्च व एप्रिल महिन्यांत शिधापत्रिकेवर मका देण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 19:22 IST2021-03-17T19:21:40+5:302021-03-17T19:22:05+5:30
कळमनुरी तालुक्यातील अंत्योदयाच्या लाभार्थ्यांसाठी ५८० क्विंटल, बीपीएल प्राधान्यसाठी ११५८ क्विंटल मका आलेला आहे.

गहू कमी करून मका देण्यात येणार; मार्च व एप्रिल महिन्यांत शिधापत्रिकेवर मका देण्याचे नियोजन
कळमनुरी : तालुक्यातील अंत्योदय, बीपीएल प्राधान्य कुटुंबांना मार्च व एप्रिल महिन्यांत शिधापत्रिकेवर आता मकाही दिला जाणार आहे. मार्च व एप्रिल महिन्यांसाठी देण्यात येणारा मका तहसील कार्यालयाच्या गोदामात आलेला आहे. येथील तहसील कार्यालय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेले आहे.
कळमनुरी तालुक्यातील अंत्योदयाच्या लाभार्थ्यांसाठी ५८० क्विंटल, बीपीएल प्राधान्यसाठी ११५८ क्विंटल मका आलेला आहे. मार्च, एप्रिल या दोन महिन्यांसाठी मका दिला जाणार आहे. अंत्योदयचे ५७२६ शिधापत्रिकाधारक असून त्यांना प्रति रेशनकार्ड १४ किलो गहू, १२ किलो तांदूळ, व ९ किलो मका दिला जाणार आहे. बीपीएल प्राधान्य कुटुंबासाठी प्रतिलाभार्थी १ किलो मका, २ किलो तांदूळ, २ किलो गहू दिल्या जाणार आहे. हा मका स्वस्त धान्य दुकानदारांकडून १ रुपये किलोप्रमाणे लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. तालुक्यात बीपीएल प्राधान्याचे १ लाख १९ हजार ५७३ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना प्रतिमाणसी १ किलो मका दिला जाणार आहे. येथील तहसील कार्यालयाच्या गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना मार्च महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले आहे. जवळपास शंभर स्वस्त धान्य दुकानदारांनी मार्च महिन्यातील मक्यासह धान्यांची उचल केलेली आहे.
आता मार्च महिन्यात अंत्योदय व बीपीएल प्राधान्य कुटुंबांना मका दिल्या जाणार आहे. गहू कमी करून त्याऐवजी मका देण्यात येणार असल्याची माहिती कारकून महेश हिवरे यांनी दिली. शासनाने बीपीएल प्राधान्य लाभार्थ्यांनाकरिता मका देण्याचा निर्णय का? घेतला हे मात्र कळू शकले नाही. मार्च-एप्रिल महिन्यात आता गव्हाच्या जाग्यावर मकाही मिळणार आहे.