पैसेवारीसाठी पीककापणी प्रयोग
By Admin | Updated: October 23, 2014 14:30 IST2014-10-23T14:30:21+5:302014-10-23T14:30:21+5:30
कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे.

पैसेवारीसाठी पीककापणी प्रयोग
>हिंगोली : तहसील कार्यालयाच्या वतीने खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशापेक्षा जास्त असल्याचे ३0 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यता आले होते. कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार तालुक्यातील विविध गावांत पीककापणी प्रयोग होत आहे.
प्रयोगासाठी गावांची विभागणी करून सर्वसाधारण ५ गावांच्या गटाकरीता एका पैसेवारी समितीच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील सर्व गावांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचे शेतावर प्रत्यक्ष फिरून पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीअंती उत्तम, मध्यम व कनिष्ठ जमिनीतील पिकांची निवड करून प्रत्येकी चार असे प्रत्येक पिकाचे एकूण बारा पीक कापणी प्रयोग करण्यात येणार आहेत. नुकताच या प्रयोगाला तालुक्यात सुरूवात करण्यात आली आहे. निवडलेला प्रत्येक प्लॉट हा १0 बाय १0 मीटरचा टाकून त्यातील पिकाची कापणी, मळणी व उधळणी करून पिकांचे वजन करून उत्पन्न काढण्यात येत आहेत. सदर पीककापणी प्रयोगासाठी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह सर्व नायब तहसीलदार यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या व पीककापणी प्रयोगाची पाहणी केली.
सदर पीककापणी प्रयोगामध्ये उत्पादनात घट असल्याचे दिसून आल्याने तालुक्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी येण्याची शक्यता तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी वर्तविली आहे. /(प्रतिनिधी)
■ भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथे सोयाबीनच्या उतार्यात पावसाच्या दडीमुळे कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नुकसीनीची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दोन वर्षांपासून निसर्ग शेतकर्यांवर कोपला आहे. मान्सूनच्या सुरूवातीपासून यंदाही पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीन बसला. परिणामी, उतार्यात कमालीची घट झाली. पाणी देऊनही एका बॅगला दोन क्विंटलाचा उतार शेतकर्यांना आला आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकर्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीनुसार सत्य अहवाल तयार करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच प्रकाश कोरडे, उपसरपंच ग्यानदेव कोरडे यांच्या स्वाक्षर्या आहेत. (वार्ताहर)