हतबल बापाची व्यथा ! माहेरी आलेल्या मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:54 PM2021-12-06T17:54:42+5:302021-12-06T17:56:30+5:30

farmer suicide : पैसे नसल्याच्या चिंतेतून त्यांनी घरात ठेवलेले कापूस फवारणीचे औषधप्राशन केले.

The pain of a helpless father! Farmer commits suicide due to lack of money for girl child | हतबल बापाची व्यथा ! माहेरी आलेल्या मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या 

हतबल बापाची व्यथा ! माहेरी आलेल्या मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या 

Next

हिंगोली : आर्थिक टंचाईमुळे मुलींंना बोळवण करण्यास कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते. या चिंतेतून ६० वर्षीय शेतकरी पित्याने कापूस फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना औंढा तालुक्यातील दुधाळा येथे घडली. कापूस फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केलेल्या वडिलाचे नाव विठ्ठलराव अमृतराव पोले असे आहे.

मागील काही दिवसांपासून शेतात नापिकी होती. त्यामुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत होता. पैसे नसल्याच्या चिंतेतून त्यांनी घरात ठेवलेले कापूस फवारणीचे औषधप्राशन केले. उपचारासाठी त्यांना नांदेड येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा ८ ऑक्टोबर २१ रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी रतनबाई विठ्ठलराव पोले यांच्या खबरीवरून औंढा पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी नोंद घेण्यात आली.

सालगडी म्हणून होते कामाला
विठ्ठलराव पोले यांच्याकडे अवघी २० गुंठे जमीन होती. त्यामुळे त्यांना सालगडी म्हणून काम करावे लागत होते. पाच वर्षांपूर्वीच त्यांचा एकुलता एक मुलगा शेतात काम करताना फिट आल्याने मृत्यू पावला होता. त्यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष म्हणून विठ्ठलराव यांच्यावरच जबाबदारी होती. त्यातच हाताची तोंडाशी मिळवणी करण्यातच आयुष्य वेचण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

दिवाळीत बोळवणीची होती इच्छा
हालाखीतच दोन्ही मुलींची लग्ने उरकली होती. त्यासाठीचे खासगी कर्जही फिटले नव्हते. आता दिवाळीत मुली घरी आल्याने त्यांच्या बोळवणीचा खर्च करायची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यासाठी रक्कम जुळत नव्हती. बोळवण न करताच मुलींना कसे पाठवायचे? या विवंचनेत विठ्ठल पोले यांनी टोकाचे पाऊल उचलले.

Web Title: The pain of a helpless father! Farmer commits suicide due to lack of money for girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app