मोफत शाळा प्रवेशाला ‘ओटीपी’ चा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:30+5:302021-03-15T04:27:30+5:30
हिंगोली : वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत मोफत प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरूवात झाली ...

मोफत शाळा प्रवेशाला ‘ओटीपी’ चा अडथळा
हिंगोली : वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत मोफत प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र सध्या ऑनलाईन अर्ज सादर करताना ओटीपीची तांत्रिक अडचण निर्माण हाेत आहे. त्यामुळे ही अडचण दूर झाल्यानंतरच पालकांना अर्ज सादर करता येणार आहेत.
वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नामांकित खासगी शाळेत २५ टक्के जागा रिक्त ठेवून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे. मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास ७९ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमध्ये ५३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. ३ मार्चपासून ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरूवात झाली असून ही प्रक्रिया २१ मार्चपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत ४०२ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना आता ओटीपीची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. ओटीपीची तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करू नये असे, आवाहन २५ टक्के मोफत प्रवेशाच्या ऑनलाईन पोर्टलवर शिक्षण विभागाने केले आहे. ओटीपीची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतरच मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. त्यामुळे पालकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अर्ज सादर करण्यासाठीची मुदत वाढवा
जिल्हाभरात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने १ ते ७ मार्च दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज सादर करताना पालकांना धावपळ करावी लागत आहे. त्यात नेटवर्क गायब हाेत असल्याने अर्ज करताना वेळ लागत आहे. आता तर ओटीपीची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.
कागदपत्रांची जुळवाजुळव
आरटीई अंतर्गत खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत शिक्षण मिळते. त्यामुळे आपल्या पाल्याला अशा खासगी शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड असते. ऑनलाईन अर्ज सादर करताना लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करीत असल्याचे पालक दिसून येत आहेत.