'शक्तिपीठ’ महामार्गास विरोध कायम; वसमतमध्ये बाभुळगावातील शेतकऱ्यांनीही मोजणी रोखली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:22 IST2025-07-16T15:21:38+5:302025-07-16T15:22:58+5:30
‘शक्तीपीठ’ महामार्ग वसमत तालुक्यातील १४ गावांतून जातो

'शक्तिपीठ’ महामार्गास विरोध कायम; वसमतमध्ये बाभुळगावातील शेतकऱ्यांनीही मोजणी रोखली
वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाला पिंपळाचौरे गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला नसला तरी रुंज,आसेगावसह १० गावांतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. १६ जुलै रोजी बाभुळगावातील शेतकऱ्यांनी ‘शक्तिपीठ’ महामार्गास विरोध दर्शवित उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. राज्याचे मुख्यमंत्री यांनी शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
‘शक्तीपीठ’ महामार्ग वसमत तालुक्यातील १४ गावांतून जात असून त्यात गुंज, रुंज, सावरगाव, लोण ,आसेगाव, पिंपळाचौरे, माळवटा, गिरगाव, जोडजवळा यासह आदी १४ गावांचा समावेश आहे. ७ जुलै रोजी पिंपळाचौरे येथील शेताची मोजणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग मोजणीस विरोध केला नाही. परंतु तालुक्यातील रुंज, आसेगाव, सावरगाव, गुंज, लोण, पळसगाव, जोडजवळा येथील शेतकऱ्यांनी या महामार्गास विरोध दर्शवित ‘आमची जमीन कदापीही रस्त्यासाठी देणार नाही. जर यासाठी शासनाने तगादा लावला तर आम्ही आत्मदहन करु’ असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, १६ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाभुळगाव येथे शेत जमीन मोजणीस अधिकारी व कर्मचारी गेले असता मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. मोजणी करण्यात येऊ नये अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेताच प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी परतले. शेतकऱ्यांनी त्यानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदन दिले. शक्तिपीठ महामार्गास कदापीही जमीन देणार नाही असे निवेदनात नमूद आहे. यावेळी सपोनि गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करावी...
शक्तिपीठ महामार्गास शेतकरी एक इंचही शेत जमीन देणार नाही. हा मार्ग शासनाने रद्द करावा, शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री यांनी चर्चा करुन त्यांचे ऐकावे. महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध कायम राहणार आहे.
- बाबूराव ढोरे, शेतकरी बाभुळगाव