रानडुकराच्या हल्ल्यात बैलजोडी बिथरून पडली विहिरीत; एक बैल ठार तर दुसऱ्याचे चारही पाय मोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 19:42 IST2018-06-04T19:42:21+5:302018-06-04T19:42:21+5:30
वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथे शेतात वखरणी करताना समोर अचानक रानडुकराचा कळप आल्याने बैलजोडी बिथरून विहिरीत पडली.

रानडुकराच्या हल्ल्यात बैलजोडी बिथरून पडली विहिरीत; एक बैल ठार तर दुसऱ्याचे चारही पाय मोडले
हिंगोली : वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथे शेतात वखरणी करताना समोर अचानक रानडुकराचा कळप आल्याने बैलजोडी बिथरून विहिरीत पडली. यात एका बैलाचा मृत्यू तर दुसऱ्या बैलाचे चारही पाय मोडले आहेत. यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यावर काळाने मोठे संकट उभे केले आहे.
वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील शेतकरी सचिन दिगंबराव सावंत हे आपल्या शेतात आज बैलजोडीच्या साह्याने वखरणी करीत होते. दरम्यान, धुऱ्यावर कलावणीच्या वेळी रानडुकराचा कळप अचानक बैलांच्या समोर आल्याने बैल बुजाडले आणि जवळच असलेल्या विहिरीत वखरासह पडले. विहीर जवळपास ६० ते ७० फूट असून पाणीच नसल्याने एक बैल ठार झाला. तर दुसऱ्या बैलाचे चारही पाय मोडले. सुदैवाने यात सावंत यांना कसलीही इजा झाली नाही. मात्र, अवघ्या काही दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपल्याने सावंत यांच्या समोर पेरणीचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे परिसरात रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा बंदोबस्त करण्याच्या मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे काही दिवसांपूर्वीच केली आहे.
नुकसान भरपाई द्यावी
परिसरातील रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे अनेकदा केली. मात्र त्यांनी लक्षच दिले नाही. आता तर बैलजोडीही गेली आहे. निदान नुकसान भरपाई तरी देण्याची मागणी दिगंबरराव सावंत यांनी केली.