हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शाॅर्टसर्किटने काढणीचा दीड एकरातील गहू जळून खाक
By रमेश वाबळे | Updated: March 3, 2025 17:09 IST2025-03-03T17:08:22+5:302025-03-03T17:09:43+5:30
काढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू शाॅर्टसर्किटने जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शाॅर्टसर्किटने काढणीचा दीड एकरातील गहू जळून खाक
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव (सोळंके) शिवारात शाॅर्टसर्किटने आग लागून दीड एकरातील गहू जळून खाक झाल्याची घटना ३ मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.
हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील शेतकरी वंदना उत्तम दिपके यांचे शेत येहळेगाव (सोळंके) शिवारातील गट क्रमांक १९७ मध्ये आहे. त्यांनी दीड एकरात गहू पेरला होता. हा गहू काढणीला आला असताना ३ मार्चला दुपारी शेतातून गेलेल्या वीज तार वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटल्या आणि ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या वाळलेल्या गव्हावर पडल्याने आग लागली. दुपारची वेळ असल्यामुळे प्रखर ऊन आणि वाऱ्याचा वेग असल्यामुळे काही क्षणांतच आग झपाट्याने पसरली.
शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जवळपास दीड एकरातील गहू जळून खाक झाला. या शेतात जवळपास २५ क्विंटल गव्हाचे उत्पादन होणार होते. आता मात्र क्विंटलभरही गहू निघणार नसल्याने शेतकरी महिला वंदना उत्तम दिपके यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती महावितरण, महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
काढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू शाॅर्टसर्किटने जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घटले. बाजारपेठेत भावही समाधानकारक मिळाला नसल्याने लागवडखर्चही वसूल झाला नाही. अशा परिस्थितीत शेतकरी महिला वंदना दिपके यांचा गहू जळाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. महावितरण कंपनी, महसूल विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.