हिंगोलीत महिला रुग्णांसाठी आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:08 IST2021-03-17T13:07:39+5:302021-03-17T13:08:51+5:30
independent corona care center for female patients in Hingoli महिलांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर निर्माण करून त्या ठिकाणी महिला डॉक्टर व स्टाफची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

हिंगोलीत महिला रुग्णांसाठी आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर
हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत असून, महिलांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. महिला रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह औंढा रोड, लिंबाळा मक्ता येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टर व स्टाफमध्येही महिलाच राहणार आहेत, असा उपाय करणारा हिंगोली राज्यातील पहिला जिल्हा असण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मागील सात ते आठ दिवसांपासून रोज ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय राहात आहे. अशावेळी महिलांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर निर्माण करून त्या ठिकाणी महिला डॉक्टर व स्टाफची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही महिलाच राहणार आहेत. महिलांना या ठिकाणी उपचार घेताना सुरक्षितता व तेवढीच सहजता वाटावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात असा उपक्रम राबविणारा हिंगोली हा पहिला जिल्हा ठरण्याची शक्यता आहे.
महिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीही लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. यात कडती उपकेंद्रातील डॉ. वैष्णवी कापसे, डिग्रस कऱ्हाळेच्या डॉ. संगीता टार्फे, भटसावंगीच्या डॉ. रूपाली मकासरे, जांभरुण तांडा येथील मंजूषा कऱ्हाळे, राहोली येथील डाॅ. सय्यद आलिया समरीन, लोहगावच्या डॉ. शांता कऱ्हाळे यांचा समावेश आहे. १६ ते २२ मार्च या कालावधीत या डॉक्टर या ठिकाणी सेवा बजावणार आहेत. यानंतर पुन्हा वेगळ्या डॉक्टरांचे पथक नेमले जाणार आहे. यात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
अनेक जण कुटुंबाची काळजी वाटत असल्याने चाचणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. आता महिलांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटर उभारण्यात आल्याने यात बदल होण्याची शक्यता आहे.