आईची बाजू घेतो म्हणून १४ वर्षीय मुलाचा खून; आरोपी पित्यास आजन्म कारावासाची शिक्षा
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: March 5, 2025 19:34 IST2025-03-05T19:34:36+5:302025-03-05T19:34:46+5:30
न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाचा भाव दिसून येत नव्हता.

आईची बाजू घेतो म्हणून १४ वर्षीय मुलाचा खून; आरोपी पित्यास आजन्म कारावासाची शिक्षा
हिंगोली : नेहमी आईची बाजू का घेतो, याचा राग मनात धरून १४ वर्षांच्या मुलाला झोपेतून उठवून त्याचा खून करणाऱ्या आरोपी पित्याला हिंगोली येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश सरोज एम. माने-गाडेकर यांनी आजन्म कारावास आणि ७५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ५ मार्च रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.
बाबुराव भगवानराव शिखरे असे आरोपी पित्याचे नाव आहे. २८ डिसेंबर रोजी रात्री ९ ते २९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे ही घटना घडली होती. या प्रकरणात अरविंद गणेशराव शिखरे यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात कलम ३०२, २०१ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे व व्ही.एम. केंद्रे यांनी तपास केला. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते.
जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश सरोज एम. माने-गाडेकर यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण चालले. सहायक सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी १४ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश सरोज एम. माने-गाडेकर यांनी आरोपी बाबुराव शिखरे यास कलम ३०२ भा.दं.वि. अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व ५० हजार रुपये दंड आणि पुरावा नष्ट केला म्हणून भा.दं.वि. २०१ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड सुनावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. एन.एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील एस.डी. कुटे, एस.एस. देशमुख, कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक टी.एस. गुहाडे, सुनीता धन्वे यांनी सहकार्य केले.
न्यायिक जिल्ह्यातील पहिला निकाल
२२ फेब्रुवारी २०२५ रोजी हिंगोली जिल्ह्याला स्वतंत्र न्यायिक जिल्ह्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात आजन्म कारावासाची ही पहिलीच शिक्षा ठरली आहे. आरोपीचे कृत्य हे अतिशय निंदनीय आहे. त्याने स्वत:च्या मुलाचा निर्घृण खून केला, असे मत नोंदवून न्यायालयाने शिक्षा सुनावली. तेव्हा आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाचा भाव दिसून येत नव्हता.
अशी घडली होती घटना
कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील बाबुराव भगवानराव शिखरे (वय ३५) याने २८ डिसेंबर रोजी रात्री ९ ते २९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान हा प्रकार केला. आरोपी बाबुराव शिखरे याने त्याचा मुलगा वैभव (वय १४) यास झोपेतून उठवून ऑटोमध्ये बसवत कुंभारवाडी शिवारातील कुरतडी पाटीच्या पश्चिमेस रस्त्यावर नेले. त्यानंतर सुताच्या दोरीने वैभवला गळफास देऊन त्यास मारहाण केली. तरीही वैभव हा हालचाल करीत असल्याने व तो मृत पावला नसल्याने आरोपी बाबुराव शिखरे याने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड डोक्यात मारून त्यास ठार केले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वैभव याचे प्रेत परत येडशी गावात आणून अरविंद गणेशराव शिखरे यांच्या घरासमोरील पायऱ्यावर टाकून दिले होते.