औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : नवऱ्यासोबत झालेल्या किरकोळ भांडणावरून जामगव्हाण येथील विवाहित महिला सीमा ज्ञानेश्वर मुकाडे (२२) हिने अडीच वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. सकाळी नवरा-बायकोचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात सीमाने टोकाचे पाऊल उचलत अडीच वर्षीय मुलीला कवटाळून विहिरीत उडी घेतली. त्यातच माय-लेकीचा करुण अंत झाला. याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पिंपळदरी येथील तातेराव रिठे यांची मुलगी सीमा हिचा विवाह जामगव्हाण येथील ज्ञानेश्वर मुकाडे यांच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. संसाराचा गाडा पुढे चालत असताना २६ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास नवऱ्यासोबत झालेल्या वादानंतर सीमाने टोकाचे पाऊल उचलत काठावर पाण्याचा हंडा ठेवून आपल्या मुलीसह शेतातील विहिरीत उडी घेतली. विहिरीच्या काठावर ठेवलेल्या हंड्यामुळे शेजारी राहणाऱ्या मुलीला शंका आल्याने तिने विहिरीत डोकावून पाहिले असता तिला सीमा ही मुलीला कवटाळलेल्या अवस्थेत पाण्यावर गटांगळ्या खात असल्याची दिसली. लागलीच तिने वडील संजय मुकाडे यांना बोलावून घेतले; परंतु तोपर्यंत दोघींचा बुडून करुण अंत झाला. संजय मुकाडे यांनी औंढा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देताच पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी पोलिस उपनिरीक्षक खुद्दस शेख, गजानन गिरी, ओंकारेश्वर राजणीकर, संदीप गोरे, अमोल चव्हाण यांना घटनास्थळी रवाना केले.
आठ तासांनंतर दोघींना काढले बाहेरविहिरीमध्ये पाणी असल्याने विहिरीतले पाणी उपसून तब्बल आठ तासांनंतर एकमेकींना बिलगलेल्या अवस्थेत असलेले माय-लेकींचे शव बाहेर काढण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दोघींचे शव पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
वीस तासांनंतर शवविच्छेदनपिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी माय-लेकींचे शव पाठविण्यात आल्यानंतर आरोग्य केंद्रात एकही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने दोघींचे मृतदेह ताटकळत ठेवावे लागले. त्यातच शवगृहात शव ठेवण्यास आरोग्य केंद्राकडून असमर्थता दर्शविल्याने नातेवाइकांची कोंडी झाली. शेवटी तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण यांना संपर्क साधून मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले. तब्बल वीस तासांनंतर २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जामगव्हाण येथील तलावाशेजारी शेतात दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.