महात्मा गांधी पुतळा चौकाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:31+5:302021-01-23T04:30:31+5:30
हिंगोली शहरात वाढदिवस, शुभेच्छा माहिती देण्यासाठीचे होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून नगरपालिकेला काही प्रमाणात महसूल मिळत असला ...

महात्मा गांधी पुतळा चौकाने घेतला मोकळा श्वास
हिंगोली शहरात वाढदिवस, शुभेच्छा माहिती देण्यासाठीचे होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून नगरपालिकेला काही प्रमाणात महसूल मिळत असला तरी अनधिकृत होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण वाढले आहे. मिळेल त्या जागेवर होर्डिंग्ज लावणारांची स्पर्धाच लागली आहे. महत्त्वाचे चौक, परिसर आदी ठिकाणी तर होर्डिंग्ज लावण्यासाठी चढाओढ निर्माण होत आहे. यातूनच महापुरुषांची महती सांगणारे चाैकही सुटले नाही. महापुरुषांच्या विचारापेक्षा होर्डिंग्ज महत्त्वाचे वाटत असल्याने महापुरुषांच्या पुतळ्यालाही होर्डिंग्जने झाकण्याचा प्रकार शहरात पहावयास मिळत होता. याकडे नगरपालिकाही दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत होते. शहरातील महात्मा गांधी चौक परिसर तर होर्डिंग्जने झाकला गेला होता. ‘लोकमत’ने या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत २२ जानेवारीच्या अंकात होर्डिंग्जमुळे चौकासह पुतळ्याचे होत असलेल्या विद्रुपीकरणाबाबत छायाचित्रे प्रकाशित केली होती. छायाचित्रे प्रकाशित होताच नगरपालिका खडबडून जागे होत अवघ्या काही तासांतच होर्डिंग्ज हटवून परिसरात स्वच्छता मोहीम राबविली गेली. त्यामुळे परिसर चकाचक दिसून येत होता. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढून चौक, महत्त्वाचे परिसर होर्डिंग्जमुक्त करावेत, अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे