सारंगस्वामी यात्रेत दीडशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:02 IST2019-01-18T00:02:04+5:302019-01-18T00:02:10+5:30
औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत १७ जानेवारी रोजी भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर असल्याने महाप्रसादासाठी हजारो भाविक यात सहभागी झाले होते.

सारंगस्वामी यात्रेत दीडशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत १७ जानेवारी रोजी भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर असल्याने महाप्रसादासाठी हजारो भाविक यात सहभागी झाले होते.
या वर्षी १५० क्विंटल भाजीच्या महाप्र्रसाद करण्यात आला होता. शिरडशहापूर येथे वीरशैव बांधवाचे आराध्यदैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते. येथे अनेक वर्षांपासून दरवर्षी मकरसंक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होते. या यात्रेत भाजीच्या महाप्रसादाचे विशेष महत्त्व आहे. यात्रेत येणारे भाविक सोबत पोळ्या घेऊन येतात. येथे तयार केलेला भाजीचा प्रसाद घेऊन भोजन करतात. तसेच भाजीचा प्रसाद घरीदेखील घेऊन जातात. येथे परिसरातील भाविक गाडी बैलाने डोक्यावर शेतातील भाजीपाला घेऊन येतात. यात टोमॅटो, वांगी, चवळी, दोडके, पालक, शेपू, मेथी, करडी, पानकोबी, फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजर, काकडी, मुळा, कांदे, ऊस आदी प्रकारच्या १५० क्विंटल भाज्याचा यात समावेश असतो. त्या सर्व भाज्या कढईत मिसळून त्यात गोडतेल मसाला टाकून फोडणी देण्यात येते, अशा भाजीचा प्रसाद तयार करण्यात येतो. या प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात येते. यात्रेसाठी चारचाकी, दुचाकी तीन चाकी वाहने तसेच पायदळ देखील भाविक येथे येत असतात. यात्रेसाठी परिवहन महामंडळाने बसची व्यवस्थाही केली होती. या यात्रेत विविध वस्तू विक्रीच्या दुकानांसह, धार्मिक पुस्तके धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात आली होती. भक्तीमय वातावरणात यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
शिरडशहापूर, सारंगवाडी, गवळेवाडी आदी ग्रामस्थांनी भाजीच्या महाप्रसादासाठी परिश्रम घेतले.