ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाइल टॅब, इंटरनेटची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:12+5:302021-07-05T04:19:12+5:30

हिंगोली : कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल झाला असून, सर्वच शाळांमधून ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे पालकांना स्मार्टफोन, ...

Increased cost of parenting due to online education; Mobile tab, Internet access | ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाइल टॅब, इंटरनेटची भर

ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाइल टॅब, इंटरनेटची भर

हिंगोली : कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल झाला असून, सर्वच शाळांमधून ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे पालकांना स्मार्टफोन, टॅब, संगणक, लॅपटॉप खरेदीसाठी २५ ते ५० हजार रुपयांचा खर्च येत आहे. त्यात इंटरनेटच्या रिचार्जसाठी वेगळा खर्च करावा लागत आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला. आतापर्यंत १५ हजार ९५० रुग्ण आढळले. तर ३८३ रुग्णांना जीव गमवावा लागला. कोरोनाला आटकाव घालण्यासाठी प्रशासनाला कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आताही काही बाबतींत निर्बंध लागू आहेत. याचा सर्वाधिक फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली.

यावर्षीही शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अनेक शाळा पाल्याला प्रवेश देतानाच पालकांकडे ऑनलाइन शिक्षणाच्या साधनाबाबत विचारणा करीत आहेत. त्यामुळे पाल्याच्या शिक्षणासाठी पालकांना मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅब आदी साधने खरेदी करावे लागत आहेत. अगोदरच आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात शैक्षणिक साधनासाठीचा खर्च वाढल्याने पालकांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

महिन्याकाठी हजार ते दीड हजारांचा खर्च

शाळांकडून नियमितपणे ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. आपलाही पाल्य अभ्यासात मागे राहू नये म्हणून पालक मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅब अशी साधने पाल्याला खरेदी करून देत आहेत. दोन पाल्य असल्यास संगणकावरील खर्च एक लाखाच्या घरात जात आहे.

त्यात दर महिन्याला इंटरनेटसाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या खर्चामुळे पालक हतबल झाले आहेत.

मुलाच्या ऑनलाइन शिक्षणासाठी जुना मोबाइल विकून नवा स्मार्टफोन खरेदी करावा लागला. त्यात दर महिन्याला रिचार्ज मारावा लागत आहे. कोरोनाच्या काळात हा खर्च परवडणारा नाही. शासनानेच विद्यार्थ्यांना मोबाइल व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी.

- प्रकाश आम्ले, पालक, हिंगोली

शाळेने ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात केली असून

दोन्ही मुलांचा एकाच वेळी क्लास असतो. त्यामुळे नाइलाजाने दोन मोबाइल खरेदी करावे लागले. त्यात दर महिन्याला इंटरनेट रिचार्जसाठी वेगळा खर्च करावा लागत आहे.

- सुभाष घुगे, पालक, हिंगोली

मुलांचे मानसिक, शारीरिक अन् शैक्षणिक नुकसान

ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांकडे जास्त वेळ मोबाइल राहत आहे. मोबाइलच्या वाढत्या वापराने मुलांचे शैक्षणिक अन् शारीरिक नुकसान होत आहे. मैदानी खेळही कमी झाल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. घरातील संवादही कमी झाल्याने मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. पालकांनीच मुलांसोबत संवाद वाढवून मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली -२२८५२

दुसरी - २३१८५

तिसरी - २२११२

चौथी - २१८७४

पाचवी -२१३४२

सहावी - २१०३४

सातवी -२०७४०

आठवी - २०५३५

नववी -१९५१९

दहावी - १९४०७

Web Title: Increased cost of parenting due to online education; Mobile tab, Internet access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.