हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द केला नाही तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल: लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:49 IST2025-09-18T14:49:15+5:302025-09-18T14:49:35+5:30
शासनाने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून समाजांत भांडणे लावली

हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द केला नाही तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल: लक्ष्मण हाके
कळमनुरी (जि. हिंगोली) : राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटचा जीआर तत्काळ रद्द करावा, अन्यथा ओबीसी समाज मुंबईत धडक देईल, असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी कळमनुरी येथे काढलेल्या ‘एल्गार मोर्चाद्वारे’ दिला.
ओबीसी समाजाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या ‘एल्गार मोर्चात’ हाके बोलत होते. प्रा. हाके म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याला आमचा अजिबात विरोध नाही. परंतु, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध राहणार आहे. सद्य:स्थितीत एकही आमदार-खासदार ओबीसी समाजाच्या बाजूने बोलायला तयार नाही. शासनाने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून समाजांत भांडणे लावली, असेही हाके म्हणाले. एससी, एसटी व ओबीसी हा ८० टक्के समाज जर एकत्र आला तर राज्यकर्त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आमचे आरक्षण आवश्यक घ्या, परंतु लक्षात ठेवा आमदार-खासदारकीचा मार्ग आमच्या गल्लीतूनच जातो. आता ओबीसींनो, वेळ आली आहे ती म्हणजे एकीची वज्रमूठ आवळायची.
जरांगेंना ‘रिझर्वेशन’चे स्पेलिंगही येत नाही...
येणाऱ्या विधानसभेत ओबीसी आमदार निवडून आपल्याला पाठवायचे आहेत. निवडून दिलेले आमदार हे आपल्या हक्कासाठी लढतील. मराठा समाजाने चौथी नापास असणाऱ्याचे नेतृत्व स्वीकारले आहे. खरे पाहिले तर मनोज जरांगे यांना ‘रिझर्वेशन’ या शब्दाचे स्पेलिंगही येत नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांच्यावर प्रा. हाके यांनी टीका केली.