रस्त्यावरून चालावं कसं?
By Admin | Updated: October 23, 2014 14:26 IST2014-10-23T14:26:55+5:302014-10-23T14:26:55+5:30
दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी वसमतच्या बाजारपेठेत रहदारीचा पुरता विचका झाला.

रस्त्यावरून चालावं कसं?
>कृष्णा देवणे, वसमत
दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी वसमतच्या बाजारपेठेत रहदारीचा पुरता विचका झाला. निवेदन दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने ऑटो, दुचाकी व गर्दीच्या कचाट्यात महिला व पादचारी सापडल्याचे चित्र वारंवार बुधवारी पहावयास मिळाले जर हीच परिस्थिती राहिली तर महिलांनी बाजारातून चालावं तरी कसं? हा प्रश्न निर्माण होत आहे.
वसमत शहरातून तीनचाकी, चारचाकी वाहनांना मुक्त प्रवेश असतो. दुकानासमोर दुचाकी आडव्या-तिडव्या लावण्याच्या पद्धतीमुळे व सामानाच्या उतरंडीमुळे अर्धा रस्ता व्यापला जातो, अशा अवस्थेत ऑटोवाल्यांची गर्दी यात भर घालत असते. सणासुदीच्या काळात शहरातील जड वाहतूक, तीन-चारचाकी वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यासाठी पोलीस कधीकाळी पुढाकार घेत असत. या दिवाळीत प्रचंड गर्दी उसळलेली असतानाही पोलीस अधिकारी-कर्मचारी मात्र बेफिकीर असल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे.
वारंवार ही समस्या भेडसावते. मात्र रहदारी सुरळीत करण्यासाठीही पोलीस पुढे येत नसल्याने शहरातील बाजारपेठेतून पायी चालणोही अवघड होवून बसले आहे.
वाहतूक नियंत्रण करण्यासाठी असलेले पथक अवैध वाहतुकीच्याच मागेपुढे धावत असल्याने शहरातील वाहतूक नियंत्रण करण्याचे बिनकामाचे काम करण्यात कोणालाच रस नसल्याचे चित्र आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेनेने वसमत पोलिसांना निवेदन देवून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली होती. मात्र या निवेदनाचीही कोणतीही दखल घेतल्या गेली नसल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले.
त्यामुळे बुधवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशीच बाजारात पायी आलेल्या महिला व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक ठप्प रहदारीत अक्षरश: महिलाही अडकून पडल्या. शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे 'बिनकामाचे काम' करण्यास कोणीच पुढाकार घेणार नसेल तर पायी चालावं तरी कसं? हा प्रश्न कायमच राहत आहे. /
(वार्ताहर)