हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण; पाच आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:00 IST2020-05-15T18:58:26+5:302020-05-15T19:00:38+5:30
लाथाबुक्यांनी व काठीने जबर मारहाण करून शिवीगाळ

हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण; पाच आरोपी अटकेत
हिंगोली : शहरातील लाला लजपतराय नगर येथे पेट्रोलिंग दरम्यान तीन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १४ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच आरोपींविरूद्ध १५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी हिंगोली शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे विठ्ठल परसराम काळे व इतर पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना दुचाकीवरून आलेल्या पाच इसमांनी या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. तसेच ‘तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी आमचा पिच्छा केला, आम्हाला का थांबविले’ असे म्हणत लाथाबुक्यांनी व काठीने जबर मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी विठ्ठल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर रूस्तुम काळे, शुभम गजानन टाले, करण राजपूत, गजानन संतोष पवार, राम सवनेकर सर्व रा. हिंगोली यांच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी विविध कलमानुसार हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.