Hingoli: सेनगाव आरोग्य कार्यालयाचा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत वानरांनी घेतला ताबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:51 IST2025-08-02T17:40:08+5:302025-08-02T17:51:45+5:30
मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची फेकाफेकी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायलर

Hingoli: सेनगाव आरोग्य कार्यालयाचा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत वानरांनी घेतला ताबा
- राजकुमार देशमुख
सेनगाव (हिंगोली) : येथील तालुका आरोग्य कार्यालयाचा कारभार पाहण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसून उपलब्ध मनुष्यबळ कार्यालयात हजर राहत नसल्याने थेट वानरांनी येथील तालुका कार्यालयाचा ताबा घेतल्याचा प्रकार १ ऑगस्ट रोजी दुपारी निदर्शनास आला. अतिशय गंभीर असणाऱ्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासन विविध नाविन्यपूर्ण योजना राबवित आहे. परंतु, ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कोणीच हजर राहत नाही, अशी सातत्याने ओरड होत असते. आता तालुका आरोग्य कार्यालयातच कुणी उपलब्ध राहत नसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे तालुका आरोग्य कार्यालय जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेवारस सोडल्याने शुक्रवारी दुपारी या मोकळ्या कार्यालयाचा थेट वानरांनी ताबा घेतला. कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी हा प्रकार व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
त्यामुळे तालुका आरोग्य कार्यालयाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे. थेट कार्यालय बेवारस सोडल्याने आरोग्य यंत्रणा किती गंभीर आहे, याचा प्रत्यय समोर आला आहे. वरिष्ठ अधिकारी बैठकीला गेल्याची संधी साधत कर्मचारी बाहेर निघून गेल्याने वानरांनीच कार्यालयाचा ताबा घेतल्याचे चित्र सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. कार्यालयात वानरे मुक्तपणे फिरत होती. तर वानरांनी काही खुर्च्याही पाडून टाकल्या होत्या. कार्यालयात एकही कर्मचारी नसल्याने वानरांचा सुमारे एक ते दीड तास मुक्त धुमाकूळ सूरू होता. अशा परिस्थितीत तालुका आरोग्य कार्यालय अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकत खालच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
...तर वेतन कपातीची कारवाई करणार - डाॅ.रूणवाल रुणवाल
सेनगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल म्हणाले की, हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठकीसाठी गेलो होतो. जे कर्मचारी कार्यालयात गैरहजर होते त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागणार आहे. ज्यांचे खुलासे असमाधानकारक असतील त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.