धक्कादायक ! लोखंडी शिडी उच्चदाब विद्युतवाहिनीत अडकल्याने दोघांचा जळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 18:05 IST2020-01-07T18:03:37+5:302020-01-07T18:05:57+5:30
मंगल कार्यालय गेटचे काम करत असताना झाली दुर्घटना

धक्कादायक ! लोखंडी शिडी उच्चदाब विद्युतवाहिनीत अडकल्याने दोघांचा जळून मृत्यू
वसमत (जि.हिंगोली) : परभणी रोडवर नव्याने होत असलेल्या मंगल कार्यालयाची कमान बसवत असताना लोखंडी शिडी ११ केव्ही उच्चदाब विजतारांमध्ये अडकल्याने दोघांचा जळून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
वसमत-परभणी रस्त्यावर श्रीकृष्ण मंगल कार्यालय नव्याने सुरू होत आहे. १ जानेवारी रोजीच मंगल कार्यालयाचे उद्घाटन झाले. या मंगल कार्यालयाच्या गेटची लोखंडी कमान बनवण्याचे काम मंगल कार्यालयाचे दोन कर्मचारी करत होते. कमान बसवण्यासाठी चाके असलेली लोखंडी शिडी होती. ही शिडी घेवून दोन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून काम केले. दुपारी शिडी परत मंगल कार्यालयात ढकलत घेवून येत असताना ११ केव्ही विज तारांना शिडीचे वरचे टोक अडकले व हायहोल्टेज विद्युत प्रवाहाने दोघेही जागीच ठार झाले. हायहोल्टेज विज प्रवाहांमुळे दोघांचे मृतदेह पूर्णतः जळाले होते.
ही घटना लक्षात येताच जवळपासच्या नागरिकांनी विद्युत विभागास कळवले. यात विलास गिरमाजी पतंगे (५५, रा.वसमत) व सिद्धार्थ केशव वाघमारे (३५, रा.गणेशपूर ता.वसमत) असे दुर्घटनेत ठार झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंदखडके व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.