सैन्यात भरती झालेल्या हिंगोलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 13:45 IST2017-09-05T13:44:40+5:302017-09-05T13:45:18+5:30
सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल नामदेव पतंगे यानं राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. हिंगोली जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

सैन्यात भरती झालेल्या हिंगोलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली, दि. 5 - सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल नामदेव पतंगे यानं राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे. मंगळवारी ( 5 सप्टेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर ) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.
आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. मात्र त्याचं आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनास्थळी ए.एस.आय. नागनाथ दीपक, पो.कॉ. प्रशांत शिंदे यांनी भेट दिली. दरम्यान, याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.