वसमत (जि. हिंगोली) : वसमत ते नांदेड या मार्गावरील आसेगाव जवळ दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. यावेळी घटनास्थळावरून जिवंत काडतुस, गावठी पिस्टल जप्त केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.
स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पोस्टे वसमत ग्रामीणच्या पोलिसांनी माहिती कळताच सात जुलै च्या मध्यरात्री वसमत ग्रामीण हद्दीत रोडवर अग्नीशास्त्रासह दरोड्याचा प्रयत्न करणारी टोळी पकडली. यावेळी आरोपी अक्षय पिराजी पवार ( रा. वडार वाडा कारखाना रोड वसमत) , अरुण संजय पवार (रा. महात्मा फुले नगर एमआयडीसी रोड परभणी), सुरज नितीन जाधव (रा. कारखाना वसमत) व इतर दोघांविरुद्ध कार्यवाही केली आहे. या आरोपींच्याविरुद्ध यापूर्वी खून,चोरी, घरफोडी व दरोडा चे १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून आरोपी सुरज जाधव हा नुकताच एमपीडीए मधून सुटलेला आहे. आरोपीकडील बाइक चार दिवसांपूर्वी नांदेडहून चोरल्याचे सांगितले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभाग पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, साईनाथ कंठे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे. वसमत ग्रामीणचे सपोनि गजानन बोराटे, पोलीस अंमलदार विजय उपरे, साहेबराव चव्हाण, विभुते यांनी केली आहे.