हिंगोलीत निष्काळजीपणा चव्हाट्यावर; ११ तारखेला परीक्षा, ८ तारखेला १ हजार प्रश्नपत्रिका जळाल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:45 IST2026-04-08T15:45:20+5:302026-04-08T15:45:55+5:30
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठेवल्या होत्या.

हिंगोलीत निष्काळजीपणा चव्हाट्यावर; ११ तारखेला परीक्षा, ८ तारखेला १ हजार प्रश्नपत्रिका जळाल्या
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पॅट (पिरॉडिक असेसमेंट टेस्ट) परीक्षेच्या १ हजार प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मराठी विषयाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठेवल्या होत्या. याच ठिकाणी असलेल्या इन्व्हर्टर व यूपीएसमध्ये विद्युत दाब कमी-जास्त झाल्याने अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून लागलेल्या आगीत या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे, या प्रश्नपत्रिकांचे वितरण ८ एप्रिललाच होणार होते. मात्र, घटनेमुळे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे.
परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार ११ एप्रिल रोजी मराठी, १५ एप्रिल रोजी इंग्रजी आणि २२ एप्रिल रोजी गणित विषयाची परीक्षा होणार आहे. मात्र आता नव्याने प्रश्नपत्रिका उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. पुणे येथून या प्रश्नपत्रिका मागवणे अल्पावधीत शक्य नसल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. तसेच बाहेरून झेरॉक्स काढल्यास प्रश्नपत्रिका फुटण्याचा धोका असल्याने पर्याय मर्यादित आहेत.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रश्नपत्रिका ठेवण्याच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसणे व विद्युत यंत्रणांची तपासणी न करणे हे गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे. पॅट परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती व बोगस नोंदी तपासण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दोन दिवसात प्रश्नपत्रिका मिळतील...
तिसरी ते सहावी वर्गापर्यंतच्या १ हजार प्रश्नपत्रिका आगीत जळाल्या. प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे यांच्याशी संपर्क साधला असून, दोन दिवसात प्रश्नपत्रिका मिळतील आणि मिळाल्या नाहीच तर झेरॉक्स काढून परीक्षा घेण्यात येईल.
- मोहम्मद तौसिफ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, औंढा नागनाथ.