हिंगोलीत महापुरूषांच्या पुतळ्यांना होर्डिंगचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:51 IST2019-01-25T17:22:49+5:302019-01-25T17:51:04+5:30

नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत.

Hingoli detection of statues of Legends of Hingoli | हिंगोलीत महापुरूषांच्या पुतळ्यांना होर्डिंगचा विळखा

हिंगोलीत महापुरूषांच्या पुतळ्यांना होर्डिंगचा विळखा

हिंगोली : शहरातील विविध चौक व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने गजबजून गेल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आहे. 

विविध राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस,सभा, समारंभ, कोचिंग क्लासेस आदींच्या डिजिटल बॅनरने सध्या हिंगोली शहराला विळखा घातला आहे. यात अनेकांनी तर नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. याकडे पालिकेची संबधित यंत्रणाही लक्ष देण्यास तयार नाही. शिवाय पालिकेतर्फे केवळ थातूर-मातूर कारवाई केली जाते. परिणामी ‘जैसे थे’ चित्र निर्माण होत आहे.

हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री अग्रसेनजी महाराज चौक यांचा पुतळा तर संपूर्ण होर्डिंगने भरून गेला आहे. तसेच महात्मा गांधीचौक परिसरालाही होर्डिंगचा विळखा आहे. शहरातील महाविर स्तंभाजवळही पालिकेचे बॅनर लावल्याचे चित्र आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच हातगाडे, ऑटो व खाजगी वाहने बिनदिक्तपणे उभी केली जातात. मंगळवारी बाजाराच्या दिवशी तर येथून पायी चालणेही कठीण होते, शिवाय वाहतूकीची कोंडी होऊन किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात केवळ खड्डे खोदून ठेवले आहेत.

Web Title: Hingoli detection of statues of Legends of Hingoli