Hingoli: थंडीचा परिणाम, पहिल्या चार तासांत वसमतमध्ये २१ तर हिंगोलीत १४ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:33 IST2025-12-20T13:33:01+5:302025-12-20T13:33:34+5:30
हिंगोलीत शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Hingoli: थंडीचा परिणाम, पहिल्या चार तासांत वसमतमध्ये २१ तर हिंगोलीत १४ टक्के मतदान
हिंगोली : जिल्ह्यात मतदानावर थंडीचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. सकाळी ७:३० वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला असून पहिल्या चार तासांमध्ये वसमतमध्ये केवळ २१ टक्के तर हिंगोलीत १४ टक्के मतदान झाले आहे.
वसमत नगरपालिकेतील नगराध्यक्षांसह नगरसेवक पदांच्या जागांसाठी शनिवारी सकाळी ७:२० वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात शनिवारी वातावरणात गारवा वाढलेला आहे. याचा परिणाम मतदानावरही दिसून आला. वसमत शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळी ११:३० वाजेपर्यंत तुरळक मतदार मतदानासाठी दाखल झाले होते. ११:३० नंतर मात्र केंद्रांवर मतदारांचा गर्दी दिसून आली. निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सकाळी ७:३० ते ११:३० या चार तासांमध्ये २०.९६ टक्के मतदान झाले. १२५४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हिंगोलीमध्ये दोन जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ११:३० वाजेपर्यंतचे आकडेवारी उपलब्ध झाली असून त्यात १४.४३ टक्के मतदान झाले. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडल्याने साधारणता अर्धा तास या ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबली होती. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. मतदान यंत्र बदलल्यानंतर येथील मतदान सुरळीत सुरू झाले. हिंगोलीतही मतदानावर थंडीचा परिणाम जाणवला.
तापमान ११ अंशावर
हिंगोलीत शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात घट झाल्याने सकाळच्या सुमारास मतदारांनी घराबाहेर पडण्याची टाळले. हिंगोली शहरातील दोन जागांसाठी मतदान होत आहे. एकूण १० मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया सुरू आहे. सकाळी साडेअकरा वाजेनंतर हिंगोली शहरातही केंद्रांवर रांगा पहावयास मिळाल्या.