हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. १२ हजार १४१ क्युसेकने पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
२७ ऑगस्टपासून जिल्ह्यात पाऊस जोरदारपणे होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातही पाऊस जोराचा होत आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात पाण्याची आवक अधिक प्रमाणात वाढली आहे. येलदरी प्रकल्पातून औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने अतिरिक्त पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून २८ ऑगस्ट रोजी दुपारी ५:३० वाजेदरम्यान सिद्धेश्वर प्रकल्पाचे १४ दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले असून पूर्णा नदीपात्रात १२ हजार १४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला असून पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरणातील पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे. या धरणाचे ५ दरवाजे ०.५० मीटरने उचलून पाण्याचा विसर्ग केला जात होता. आता पाचही दरवाजे ०.२० मीटरपर्यंत कमी करण्यात आले आहेत. पैनगंगा नदीपात्रात ३३६८ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
दोन दिवस येलो अलर्ट...मुंबईच्या वेधशाळेने जिल्ह्याला आणखी दोन दिवस येलो अलर्ट दिला आहे. २८ आणि २९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज या वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे शुक्रवारीदेखील जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.