मदत वाऱ्यावरच ; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST2021-05-08T04:30:56+5:302021-05-08T04:30:56+5:30
हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना ...

मदत वाऱ्यावरच ; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार ?
हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप ही मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. सध्या दिवसाआड काही दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असली तरी दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यात रिक्षा वाहतुकीसही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कडक संचारबंदी काळात रिक्षाचालकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. घोषणा करून महिना होत आला तरी अद्याप रिक्षाचालकांना मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे, मदतीसाठी नेमकी नोंदणी कशी करायची, कोणाकडे करायची, याचीच माहिती रिक्षाचालकांना नाही. त्याचबरोबर परवाना असलेल्या रिक्षाचालकांची संख्या २ हजार ३५० च्या वर असताना केवळ ८१९ चालकांनाच मदत देण्याचे नियोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केल्याचा आरोप जय भगवान ऑटो महासंघाने केला आहे. त्यात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचारच करण्यात आला नसल्याचा आराेपही केला आहे. कोणताही भेदभाव न करता सरसकट रिक्षाचालकांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा केली. या निर्णयात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. रिक्षा बंद असल्याने घर कसे चालवावे?
- अनिल गायकवाड,
संचारबंदीच्या काळात रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा हवेतच विरली आहे. अद्याप रिक्षाचालकांना कसलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी जगायचे कसे?
- संजय अंभोरे
शासनाने परवानाधारक व विनापरवानाधारक असा भेदभाव न करता सरसकट सर्व रिक्षाचालकांना मदत द्यावी, रिक्षा बंद असल्याने चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- भगवान बांगर, जिल्हाध्यक्ष, जय भगवान ऑटो महासंघ
परवानाधारक रिक्षाचालकांचे बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमानुसार रिक्षाचालकांना मदत दिली जाणार आहे.
- अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली
जिल्ह्यातील परवानाधारकांची संख्या - ८१९
परवाना नसलेले रिक्षाचालक - २३५०