उन्हाचा त्रास वाढला; पीपीई कीटचा वापर घटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST2021-05-09T04:30:28+5:302021-05-09T04:30:28+5:30
सध्या उन्हाळ्यामुळे या कीटचा वापर आवश्यकतेनुसारच केला जात आहे. ती वापरल्यास घामाघूम होत असल्याने पूर्ण कीट वापरली जात नसली ...

उन्हाचा त्रास वाढला; पीपीई कीटचा वापर घटला!
सध्या उन्हाळ्यामुळे या कीटचा वापर आवश्यकतेनुसारच केला जात आहे. ती वापरल्यास घामाघूम होत असल्याने पूर्ण कीट वापरली जात नसली तरीही आवश्यक तेवढी काळजी घेतली जात आहे, असे एका डॉक्टरांनी सांगितले.
मी कीट घातल्याशिवाय कोरोना वाॅर्डात प्रवेश करीत नाही. मात्र, कीट घातल्यावर सध्या उन्हाळ्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे कधी कधी जेथे आवश्यकता नाही, अशावेळी कीटपेक्षा इतर साहित्याचा वापर करतो, असे दुसऱ्या एका डॉक्टरांनी सांगितले.
राउंडच्या वेळी आम्हाला प्रत्येक रुग्णांना इंजेक्शन देणे, गोळ्या वाटप करणे, ऑक्सिजन लेव्हल मोजणे, आदी कामे अगदी जवळून करावी लागतात. त्यामुळे कीट वापरतो. एरवी ती वापरणेच सध्या शक्य नाही, असे एका परिचारिकेने सांगितले.
पीपीई कीट घालून काम करताना उन्हाळ्यामुळे मोठी अडचण होत आहे. पूर्वी कीट वापरायची. मात्र, सध्या ग्लोव्हज, फेस शिल्ड, हेअर कव्हर, मास्क घालूनच रुग्णसेवा करते, असे एका परिचारिकेने सांगितले.
पीपीई कीटचा वापर करायला पाहिजे, हे खरे असले तरीही सध्या उन्हाळ्यामुळे या कीटचा मोठा त्रास होतो. तरीही परिस्थितीनुरूप कीट वापरली जाते. इतर प्रतिबंधात्मक उपाय मात्र करतो, असे एका वाॅर्डबाॅयने सांगितले.
काही डॉक्टर व परिचारिकांनी कीट घातलेली दिसते, तर काहींनी ती घातलेली नसते. मात्र, ही मंडळी तरीही आमची सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम, असे एका रुग्णाने सांगितले.
पीपीई कीट घातल्याने कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यावरही विषाणू संसर्ग होण्याचा धोका टळतो. मात्र, येथे डॉक्टर व परिचारिकांना कायम सेवेत राहावे लागते. अनेकदा रुग्णाची प्रकृती बिघडली की, डॉक्टर कीट न घालताच धावत येतात. ग्लोव्हज, मास्क व इतर उपाय तेवढे केले जातात. मात्र, सेवा देताना त्यांनी स्वत:कडेही लक्ष द्यावे, असेही एक रुग्ण म्हणाला.
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर ४
डॉक्टर १६
कर्मचारी ५०
कोविडवर उपचार करणारी रुग्णालये १६
डॉक्टर ८०
कर्मचारी २५०