घरावर गृह विलगीकरणाचे स्टिकर लावण्यासाठी नेमले आरोग्यसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:04+5:302021-03-18T04:29:04+5:30
हिंगोली : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता विविध उपाययोजनांनी वेग घेतला आहे. यामध्ये आता या आजाराचे रुग्ण असलेल्या घरांवर ...

घरावर गृह विलगीकरणाचे स्टिकर लावण्यासाठी नेमले आरोग्यसेवक
हिंगोली : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता विविध उपाययोजनांनी वेग घेतला आहे. यामध्ये आता या आजाराचे रुग्ण असलेल्या घरांवर गृह विलगीकरणाचे स्टिकर लावण्यासाठी शहरी भागात १५ आरोग्य सहाय्यक व सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत. कोरोना रुग्णांकडून गृह विलगीकरणाचा काळ पूर्ण न करताच ते अथवा त्यांचे कुटुंबीय बाहेर पडत असल्याचे निदर्शनाला येत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक रुग्णाच्या घरावर गृह विलगीकरणाचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात संबंधित आरोग्य यंत्रणेकडून हे शक्य असले तरीही शहरी भागात अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे शक्य होत नव्हते. शिवाय शहरी भागातच रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर शहरी भागात १५ जणांना या कामासाठी नेमले आहे. यात हिंगोली शहरासाठी आरोग्य सहाय्यक एम. यू. देशपांडे, एस. एम. डुकरे, अवैद्यकीय सहाय्यक पी. एस. जटाळे, कुष्ठरोग तंत्रज्ञ रवींद्र भालेराव, पीएम डब्ल्यू भगतसिंग पथरोड यांची हिंगोली शहरासाठी प्रतिनियुक्ती केली आहे. तर आरोग्य सहाय्यक ओ. आर. स्वामी, डी. एच. भांगे, कुष्ठरोग तंत्रज्ञ संजय जाधव यांची वसमत शहरासाठी, आरोग्यसेवक बी. एस. मुकाडे, डी. पी. पंधरे, बी. के. मस्के यांची कळमनुरी शहर, बी. आर. कुटे, पी. बी. देवकते यांची औंढा शहर तर एस. एस. बोरबळे व एम. एच. पोले यांची सेनगाव शहरासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रात कोरोना रुग्णाच्या घरावर गृह विलगीकरणाचे स्टिकर लावून त्यांच्या दैनंदिन अहवालाच्या नोंदी सादर करायच्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील कर्मचाऱ्यांनी असे स्टिकर लावायचे आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण ठेवायचे असून, यात दिरंगाई केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.