बीएसएनएल सेवा ठरतेय ग्राहकांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:36 IST2018-03-23T23:36:20+5:302018-03-23T23:36:20+5:30
बीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे. आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल्याचे चित्र आहे.

बीएसएनएल सेवा ठरतेय ग्राहकांची डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगाफाटा : बीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे. आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल्याचे चित्र आहे.
नागपूर नांदेड ही बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड लाईनही वारंगा फाटा येथून संपूर्ण जिल्हाभरात वितरित केली आहे. चार ते पाच दिवसांपासून ही सेवा नियमित विस्कळीत होत आहे. काही तरी कारणाने ही सेवा दिवसभर विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही सेवा सर्व बँका, शासकीय, निमशासकीय कार्यालयात असल्याने अनेक कार्यालयीन कामे ठप्प झाले आहेत.
दरम्यान, वसमत येथील ज्युनियर टेलिकॉम अधिकारी विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सद्या राष्ट्रीय महामार्गाचे खोदकाम सुरू असल्याचे कारण त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता चार ते पाच दिवसांपासून हा प्रकार असला तरहीही ही यंत्रणा करतेय काय ? असा सवाल ग्राहक करीत आहेत. हदगाव, उमरखेड, वारंगा फाटा आदि ठिकाणी खोदकामादरम्यान फायबर केबल तुटत असल्याने सेवा खंडित होत आहे. तुटलेले केबल ताबडतोब जोडले जात आहेत. मात्र एका ठिकाणची दुरूस्ती झाली की दुसरीकडे सदरील केबल तुटत असल्याने सर्वांना या सेवेत अडचण येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.